अकलूजच्या मंडईला आठवडा बाजाराचे स्वरूप
अकलूज ( प्रतिनिधी ): कोरोना सारख्या महाभयंकर संकटावर मात करण्यासाठी आपले शासन व प्रशासनाने गर्दी टाळावी म्हणून जमावबंदीचे आदेश दिले. असे असतानाही अकलूजच्या मंडईला आठवडा बाजाराचे स्वरूप आल्याचे चित्र पाहायला मिळाले. तर रोड शौकिनांचाही मंडई परिसरात विनाकारण वावर दिसून आला. महाभयानक आशा प्राणघातक कोरोना सारख्या क्रूर विषाणूने जगभरात थैमान घालून कित्येकांचे जीवन संपवले आहे व संपवतो आहे. आपल्या देशातला कोरोनाचा शिरकाव पाहता अत्यंत चिंतेचा व काळजीचा विषय बनला आहे. अशा या प्राणघातक विषाणूंचा प्रादुर्भाव आणि संसर्ग रोखण्यासाठी आपले शासन-प्रशासन, डॉक्टर यंत्रणा ,पोलिस यंत्रणा ,स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जीवाची बाजी लावून रात्रंदिवस उपाययोजना करीत असताना दिसत आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी ३१ मार्चपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आलेले आहेत. तर संपूर्ण महाराष्ट्र लॉकडाऊन करण्यात आला आहे. एवढेच नाहीतर विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात जनता कर्फ्यु लावण्यात आला होता. अकलूज गावच्या दृष्टीनेही अकलूज ग्रामपंचायतीचे सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनीही सदर विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात खबरदारी घेत,अकलूजच्या प्रत्येक चौकाचौकांमध्ये माहिती फलक लावले आहेत. तर प्रत्येक घराघरात या आजारा संदर्भातील माहिती व घ्यावयाची काळजी याची पत्रके दिले आहेत.तसेच स्पीकरद्वारेही माहिती सांगण्याची तरतूद केली आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी शासन-प्रशासन रात्रंदिवस एक करीत असताना आपल्या सुरक्षिततेसाठी वारंवार गर्दी करू नका, काळजी घ्या, घरात बसून राहावा असेच सांगत आहेत. असे असतानाही पालेभाज्या विक्रेत्यांनी, व्यापार्यांनी कोणत्याही प्रकारचे नियोजन न करता अकलूजच्या मंडईला आठवडा बाजाराचे स्वरूप आणले. तर पालेभाज्यांचीही चढ्या भावाने विक्री सुरू केली आहे. ही अत्यंत चिंताजनक बाब असून याकडे लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता असल्याचे बोलले जात आहे.

0 Comments