अकलूज( प्रतिनिधी ) हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजयंती सोहळा साजरा होत असून, गुरुवार दिनांक १२ मार्च रोजी सकाळी ९ वाजता विजय चौक अकलूज येथे शाहिरी स्पर्धेचे व परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती छत्रपती शिवजयंती मध्यवर्ती महोत्सव समितीचे माळशिरस तालुका अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते- पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी अण्णासाहेब इनामदार, माणिक बापू मिसाळ, शाहिर परिषद अध्यक्ष शाहीर राजेंद्र कांबळे, सुधीर रास्ते,मयूर माने उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आपण पोवाड्यांची परंपरा पाहत आहे. ही परंपरा लुप्त होऊ नये तसेच या कलाकारांना व त्यांच्या कलेला अश्रय मिळावा म्हणून या स्पर्धा राबवण्यात येत आहेत. पुढील वर्षी मोठ्या प्रमाणात या स्पर्धा राबवल्या जातील तर यापुढे सर्वच महापुरुषांच्या जयंतीनिमित्त त्यांचे विचार विविध कार्यक्रमातून समाजापर्यंत पोहोचवणार आहे. यापूर्वी सहकार महर्षींनी महाराष्ट्र राज्यातील सर्व शाहिरांचा सन्मान अकलूजमध्ये केला होता. तर प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनीही शाहिरी स्पर्धा भरवून त्यांचा सन्मान केला होता. त्यानंतर आज पहिल्यांदाच आम्ही एक दिवसीय शाहिरी स्पर्धा व परिषदचे आयोजन केले असून, रोख रक्कम स्वरूपात बक्षिस व संपूर्ण कपड्याचा आहेर देऊन शाहिरांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
0 Comments