Hot Posts

6/recent/ticker-posts

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ‍सर्व प्रकारची दुकाने बंद

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ‍सर्व प्रकारची दुकाने बंद
मात्र अत्यावश्यक सेवा सुरु राहणार : जिल्हाधिकारी शंभरकर यांनी जारी केले आदेश


 सोलपूर . कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून अत्यावश्यक  सेवा वगळून  सर्व प्रकारची दुकाने आजपासून 31 मार्च 2020  पर्यंत बंद ठेवण्याचे  आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज जारी केले.  जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, सोलापूर जिल्ह्यामधील  आठवडे जनावरांचा बाजार, मॉल्स, सोने-चांदी कापड, ऑटोमोबाईल, भांडी, इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक्स, प्लायवूड विक्री आणि इतर दुकाने बंद ठेवण्याचा आदेश लागू करण्यात आला आहे.  मात्र यातून जीवनावश्यक वस्तु, किराणा दुकाने, औषधे, फळे, भाज्या यांची विक्री करणारी दुकाने वगळण्यात आली आहेत. नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी सेवा आस्थापना, उपहारगृह, खाद्यगृह, खानावळ, क्लब/पब, व्हिडीओ पार्लर, ऑनलाईन लॉटरी सेंटर इत्यादी ठिकाणी 31 मार्च 2020 रोजीच्या रात्री बारा वाजे पर्यंत सुरू ठेवण्यास मनाई करण्यात येत आहे. त्याचबरोबर वाईन शॉप, बीअर शॉप, परमिट रुम, बीअर बार, देशी दारु विक्रीची दुकानेही 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. मात्र सदरचे आदेश पुढील बाबींना लागू राहणार नाहीत. 1) शासकीय निम-शासकीय कार्यालय, सरकारी महामंडळाचे उपक्रम, आस्थापना, 2) अत्यावश्यक सेवेतील व्यक्ती , दवाखाने, पॅथॉलॉजी लॅब 3) सर्व प्रकारचे वैद्यकीय, नर्सिग कॉलेज 4 ) रेल्वे स्टेशन, एस.टी. स्टॅन्ड, महानगर परिवहन थांबे, स्थानके, रिक्षा थांबे इत्यादी. 5) अंत्यविधी (या ठिकाणी गर्दी होऊ नये याची दक्षता घ्यावी) 6) विद्यार्थ्यांसाठी खानावळ, महाविद्यालय वस्तीगृह यामधील कॅन्टीन, मेस (केवळ परिक्षार्थी) 7) इ. 10 वी , 12 वी  तसेच स्पर्धा  परीक्षा, विद्यापीठ परीक्षा देणारे विद्यार्थी व संबंधित काम पाहणा-या व्यक्ती  8) प्रसारमाध्यमांची कार्यालये ( दैनिके, नियतकालिके, न्यूज चॅनेल इ.) 9) मॅन्युफॅक्चरिंग आणि प्रॉडक्शन कंपनी 10) बँका  11) मोबाईल कंपन्या (संबंधित टॉवरचे काम सुरू राहील)   अत्यावश्यक किराणा सामान, दूध, दुग्धजन्य उत्पादने, फळे, भाजीपाला, औषधे, पेट्रोल पंप, जीवनावश्यक वस्तू  विक्री करण्यास परवानगी राहील. सर्व हॉटेल, लॉज, येथे वास्तव्यास असणा-या  ग्राहकांना आरोग्यविषयक खबरदारी   घेऊन रेस्टॉरंटमध्ये खाद्य पदार्थ बनवून देण्यास परवानगी  राहील, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.  सर्व अधिकारी, कर्मचारी, शिक्षक यांनी त्यांचे नेमणूक आदेश ओळखपत्र,  विद्यार्थ्यांनी  परीक्षा ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक आहे   या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती  संस्था अथवा संघटना भारतीय दंडसंहितेच्या कलम 188 मधील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाईस पात्र ठरतील. आदेशाचे उल्लघन करणा-या व्यक्ती , संस्था अथवा संघटना यांच्याविरुध्द संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनी कारवाई करावी, असे आदेशात नमूद आहे. याबाबत कोणाला काही शंका असल्यास त्यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (9870102893), सोलापूर महापालिकाचे आयुक्त दीपक तावरे (9892799199), सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ ( 9422206040), अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव ( 9922601133), निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख (9867797017) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे
Reactions

Post a Comment

0 Comments