‘तणहोळी हरित चळवळ जोमाने सुरु’
वर्षभर दर-पौर्णिमेला तणहोळी भारतभर साजरी होणार...!!!
बायोस्फिअर्स; पर्यावरण मंच, भारतीय मजदूर संघ; पुणे महानगरपालिका (पर्यावरण विभाग, जैवविविधता व्यवस्थापन समिती); पुणे वनविभाग; स्वा. सावरकर अध्यासन केंद्र, पुणे व इतर सेवाभावी, शैक्षणिक व संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. ९ मार्च २०२० रोजी सायंकाळी ६.३० वाजता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्मारक, कर्वे रोड, विमलाबाई गरवारे प्रशाले समोर, पुणे-४ येथे उपद्रवी परदेशी तणांबाबत, जैविक आक्रमणाबाबत योग्य ती जनजागृती व पर्यावरणीय साक्षरता यावी, ह्या हेतूने प्रतीकात्मक उपद्रवी परदेशी तणांची, तसेच प्राण्यांच्या प्रतीकात्मक प्रकाशचित्रांची “तण-होळी” चे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी पुण्यनगरीच्या उपमहापौर सरस्वतीताई शेंडगे;रंगनाथ नाईकडे, वनसंरक्षक (सामाजिक वनीकरण), पुणे; किरण दगडे (पाटील), अध्यक्ष, जैवविविधता व्यवस्थापन समिती, पुणे म.न.पा., निलीमाताई खाडे, नगरसेविका; डॉ. अशोक गिरी, जेष्ठ शास्त्रज्ञ, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे; ल.म. कडू, जेष्ठ साहित्यिक; डॉ. सचिन अनिल पुणेकर, अध्यक्ष, बायोस्फिअर्स; श्री. मंगेश दिघे, पर्यावरण अधिकारी, पुणे म.न.पा.; भारतीय मजदूर संघ, पर्यावरण मंच चे रवींद्र देशपांडे, श्री. दीपक कुलकर्णी; श्री. दत्तात्रय महाराज गायकवाड, संत साहित्याचे लेखक; बायोस्फिअर्स व पर्यावरण मंच चे संस्थेचे अमित पुणेकर, अशोक थोरात, संजय नांगरे, शैलेंद्र पटेल व निसर्ग अभ्यासक, निसर्गप्रेमी, जनसामान्य, पत्रकार, कार्यकर्ते व शासकीय अधिकारी वर्ग मोठ्या संखेने उपस्थित होता. यावेळी तणहोळी हा उपक्रम सर्वदूर जाण्यासाठी “तणहोळी हरित दिन” म्हणून शासनातर्फे घोषित व्हावा असा विचार नाईकडे यांनी मांडला. तर पुणे महानगरपालिका सभागृहात येणाऱ्या काळात तणांबाबत विशेष धोरण ठरविले जाईल असा विश्वासशेंडंगे यांनी दिला. कार्यक्रमाचे निवेदन दत्तात्रय गायकवाड यांनी केले. डॉ. सचिन पुणेकरांनी प्रस्तावना केली व दिपक कुलकर्णी यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता सामुहिक पसायदानाने झाली.
भारतीय संस्कृतीत होळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी वाईट प्रवृत्तींचे दहन करण्याकरीता होळी पेटवली जाते. मात्र, असे करताना अनेक स्थानिक-देशी वृक्षांचा नाहक बळी दिला जातो. भारतीय सण निसर्गाशी नाते सांगणारे आहेत. निसर्गाशी असलेले ऋणानूबंध जपणारे हे सण आहेत. मात्र काळानुसार हे सण निसर्गापासून दूर जाऊ लागले आणि त्यांचा मूळ उद्देश मागे पडला. मात्र सण साजरे करताना पर्यावरणीय परिस्थितीचे भान राखणे देखील गरजेचे आहे. दिवसेंदिवस आपल्या परिसरातील वनराई, हरित क्षेत्र कमी होत आहे आणि याचा थेट परिणाम आता त्यावर अवलंबून असलेल्या जीवसृष्टीवर व ओघाने मानवी जीवनावर सातत्याने होत आहे. हे पर्यावरणीय संकट टाळण्यासाठी होळी सणाच्या निम्मित्त स्थानिक-देशी वृक्षांऐवजी उपद्रवी परदेशी वृक्ष व तणांची होळी केली तर ते संयुक्तिक व सध्यपरीस्थितिला पूरक होईल. आपणास ज्ञात आहेकी परदेशी उपद्रवी तणे-वृक्ष, वन व जल परिसंस्थांचा समतोल बिघडवतात, स्थानिक वनस्पती नष्ट करतात. पिकांचे उत्पादन घटण्यास कारणीभूत ठरतात. तसेच तणांद्वारे किडींचा व रोगांचा प्रादुर्भाव होतो. जल-तणांमुळे डासांची अपरिमित वाढ होते, त्यामुळे भयंकर आजार होतात. त्यावर उपाय म्हणून आपण परदेशी तणे नष्ट करायला हवी. म्हणूनच या तणहोळीचे आयोजन करण्यात येते. तण-होळी मध्ये रानमारी, टणटणी (घाणेरी), उंदीरमारी (ग्लीरीसीडीया), सुबाभूळ (खरतर कुबाभूळ), ऑस्ट्रेलिअन बाभूळ, एरंड, कॉसमॉस (सोन कुसुम), धनुरा (गाजर गवत किंवा चटक चांदणी), चिमुक काटा, हिप्टिस, टेकोमा, जलपर्णी, जलकुंभी या उपद्रवी तणांना जाळण्यात आले. तणांन-बरोबरच कोरोनाव्हायरस, तिलापिया मासा, गप्पी मासा, अफ्रीकन स्नेल, मेक्सीकन भुंगा, उपद्रवी परदेशी मासे, किडे व सूक्ष्मजीवांच्या प्रातिनिधिक प्रकाशचित्रांचे दहन देखील करण्यात आले. थोडक्यात काय तर तणहोळी हा जैविक आक्रमणाबाबतचा हा जागर आहे. तणहोळी साजरी करण्याचे हे चौथे वर्ष होते. ह्यावर्षी पुण्याबरोबर भारतीय वनस्पती सर्वेक्षण, गंगतोक, सिक्कीम व अभिनव प्रतिष्ठान, सिल्लोड यांनीही तणहोळीचे आयोजन कोकणात (रत्नागिरी, महाड), पश्चिम महाराष्ट्र (इंदापूर), मराठवाडा (सिल्लोड) व भारतातील विविध राज्यात (सिक्कीम, कोलकता-पश्चिम बंगाल) देखील करण्यात आले. याच हरित अभियानाचा पुढचा टप्पा म्हणून नुकताच “तणहोळी हरित चळवळ” मेळावा देखील पुण्यात ५ मार्च २०२० रोजी आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला जनसामान्य, शेतकरी, निसर्ग अभ्यासक, निसर्गप्रेमी, वारकरी, कार्यकर्ते, पत्रकार, शास्त्रज्ञ, शासकीय अधिकारी, शैक्षणिक संस्था, संशोधन संस्था, शासकीय विभाग, गणेश मंडळे, सेवाभावी संस्था व लोकप्रतिनिधी यांची गुणात्मक उपस्थिती होती. सदर मेळाव्यात ‘तणहोळी’ राष्ट्रभर साजरी करण्याबाबत व भारत देशावर होणाऱ्या परदेशी जैविक आक्रमणाबाबतचा जागर व तणहोळी हरित चळवळीची स्थानिक, जिल्हा, राज्यीय व राष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रमाची आखणी करणेबाबत ध्येय-धोरणं ठरविण्यात आली. हे हरित अभियान येणाऱ्या काळात होळीच्या दिवसाबरोबर विविध उपद्रवी तणाची वेगवेगळ्या मोसमातील उपलब्धता लक्षात घेता वर्षभरातील प्रत्येक पौर्णिमेला भारतभर विविध ठिकाणी साजरी होणार आहे. तणहोळी हा एक उपक्रम नसून तो एक संस्कार किंवा विचार म्हणून अंगी बाळगावा यासाठी हि चळवळ विशेष कार्य करेल. तसेच पर्यावरण, आर्थिक व आरोग्यविषयक उपद्रवी तणांचे धोके लक्षात घेवून या अभिनव, पर्यावरण संवर्धन उपक्रमाचे लोकचळवळीत रुपांतर व्हावे, जनजागृतीचा भाग म्हणून तणहोळीचे शहरभर, गावात, प्रभागात, उपशहरात, वन्यजीव संरक्षित क्षेत्रात व इतर संबधित ठिकाणी योग्यत्या नियंत्रणाखाली कार्यक्षेत्रात वर्षभर आयोजन करण्यात येईल. तणहोळी हि एक ठिणगी असून तिचा वनवा व्हायला हवा. स्थानिक देशी वनस्पतींना-प्राण्यांना वाव, उपद्रवी परदेशी वनस्पतींना चलेजाव म्हणण्यासाठीची हि चळवळ. यासाठीचा चळवळीचा नारा असेल “हटवा तण वाचवा वन, हटवा तण वाढवा वन”, “तण मुक्त भारत स्वच्छ भारत”.
0 Comments