पाण्याचे योग्य नियोजन न केल्यास दहा वर्षात 40 कोटी लोकांना पाणी मिळणे अशक्य- सुनंदाताई पवार
टेंभुर्णी [प्रतिनिधी ]: पाण्याबाबत आपण योग्य काळजी घेतली नाहीतर गंभीर परिणाम भोगावे लागतील.दहा वर्षात ४० कोटी लोकांना पिण्यास मिळणार नाही अशी भीती बारामती येथील अग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रष्टच्या ट्रस्टी सुनंदाताई राजेंद्र पवार यांनी व्यक्त केली.
टेंभुर्णीत श्रीस्त्रीशक्ती महिला मंडळाच्या वतीने आयोजित आनंद मेळाव्याचे उदघाटन सुनंदाताई पवार यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना सुनंदाताई पवार बोलत होत्या.पुढे बोलताना त्या म्हणाल्या की,महिलांची काहींना काही सतत धडपड सुरू असते.बारामती येथे ट्रस्ट च्या माध्यमातून १२-१३ हजार मुले शिक्षण घेतात.खा.शरद पवार संस्थेचे अध्यक्ष आहेत.महिला उद्योजक बनल्या त्यांच्यासाठी उत्पादक व ग्राहक मिळावा,बाजरापेठ उपलब्ध व्हावी यासाठी पुण्यात भीमथडी यात्राचे १५ वर्षांपासून आयोजन करीत आहोत.यात्रेतून चांगले यश मिळते.चांगली दर्जेदार उत्पादने ठेवल्यास चांगली मागणी येते.
सर्व कुटुंबीयांनी सक्षमपणे महिलांच्या पाठीमागे असायला हवे,यामुळे ताणतणाव येत नाही.कुटुंबीयांनी साथ दिल्याने मोकळ्या मनाने काम करता येते.सुजाण पालकत्व ज्या दाम्पत्यामध्ये असेल त्यांचीच मुले भविष्यात यशस्वी होतील. मुलीबाबत आई वडिलांचे अतिरिक्त प्रेशर असते.जास्त दबाव झाल्यास मुले आत्महत्या करतात.मोबाईलमुळे घरातील सुसंवाद कमी झाला आहे.मुलांबरोबर मैत्रीचे नाते असेल तरच सुसंस्कारी पिढी निर्माण होते.एकदा संकल्प केल्यानंतर तत्वाशी तडजोड करू नये.मान अपमान सहन करण्याची तयारी ठेवल्यास यश नक्की येते.मुलींचे गर्भ वाचले पाहिजेत.मुले नसतील तर काहीच नडत नाही हे अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्रीस्त्रीशक्ती मंडळाच्या अध्यक्षा शिला पाटील यांनी केले.सूत्रसंचालन सविता जगताप यांनी केले.कार्यक्रमास जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती रजनी देशमुख,माढ्याच्या नगराध्यक्षा मीनल साठे,जि.प.सदस्या अंजनादेवी पाटील,जि.प.सदस्या रोहिणी ढवळे,जि.प.सदस्या सविता गोसावी,सविता व्होरा,जयश्री येवले-पाटील,सुरेखा गायकवाड,व्याख्याते शिवाजी पवार,बचत गटाच्या स्वाती पाटील, संस्थेच्या उपाध्यक्षा सुवर्णा भोसले,इंदुमती लोभे-पाटील,पल्लवी गायकवाड,रत्नमाला शिंदे,डॉ राहुल पाटील,ऋषिकेश बोबडे हे मान्यवर व इतर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
0 Comments