सोलापूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि शरद पवार यांचे निकटवर्तीय आमदार दिलीप सोपल यांनीही राष्ट्रवादीला राम राम करत पवारांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे . 28 ऑगस्ट रोजी सोपल यांचा शिवसेनेत प्रवेश होणार आहे.
सोपल यांच्या शिवसेना प्रवेशामुळे सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीला मोठी खिंडार पडली आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्या भाजपा प्रवेशानंतर सोपल यांचा शिवसेना प्रवेश राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे. आपल्या सोपल बंगला येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत आपण शिवसेना प्रवेश करत असल्याची घोषणा सोपल यांनी केली.
गेल्या 2 आठवड्यात मी कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. त्यानंतर, प्रवेशाचा निर्णय सर्वांनी मिळून घेतला. त्यानुसार मंगळवारी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा देणार असून 28 तारखेला मुंबईत शिवसेना प्रवेश करणार असल्याची घोषणा आमदार दिलीप सोपल यांनी केली.
राष्ट्रवादीकडून सोपल यांना मंत्रीपदही देण्यात आलं होतं. तसेच, आघाडी सरकारच्या काळात महामंडळाचे अध्यक्षपदही सोपल यांना मिळालं होतं. त्यामुळे सोपल राष्ट्रवादी सोडणार नाहीत, असे शरद पवारांसह, अजित पवारांनाही वाटत होते. मात्र, सोपल यांच्या घोषणेमुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांचा विश्वास फोल ठरल्याचे सिद्ध झाले आहे.
0 Comments