Hot Posts

6/recent/ticker-posts

एटीएममध्ये दोनशेच्या नोटेचा ट्रे लावण्यामुळे चलन तुटवडा : RBI

मुंबई : देशातील दहा राज्यांमध्ये चलन तुटवडा का झाला, याचं कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितलं आहे. एटीएममध्ये दोनशे रुपयांच्या नोटेचा ट्रे लावण्याची प्रक्रिया चालू असल्यामुळे चलन तुटवडा निर्माण झाला, असं आरबीआयने म्हटलं आहे. आरबीआयने दोनशे रुपयांची नोट जारी केल्यानंतर एटीएमच्या रिकॅलिब्रेशनची प्रक्रिया चालू आहे.

एटीएममध्ये ट्रे लावण्याची प्रक्रिया तातडीने सुरु करण्यात आली, मात्र देशातील काही भागांमध्ये यासाठी उशिर झाला. एटीएममध्ये कॅश भरण्यासाठी लॉजिस्टिकची समस्या तर आहेच, शिवाय एटीएम नव्या नोटांसाठी अनुकूल नसल्याने चलन तुटवडा निर्माण झाला, असं आरबीआयचं म्हणणं आहे.

दरम्यान, चलनात दोन हजार रुपयांच्या नोटांचा नव्याने पुरवठा करणं बंद केल्याची माहिती केंद्र सरकारने दिली. याचा अर्थ, सध्या चलनात असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा बंद होणार नसून, केवळ नव्या नोटांची छपाई आणि वितरण थांबवल्याचं केंद्रातर्फे स्पष्ट करण्यात आलं.

पाचशेच्या नोटांची छपाई पाचपट

सध्या दररोज पाचशे रुपयांच्या 500 कोटी रुपये किमतीच्या नोटा छापल्या जात आहेत. नोटांची ही छपाई क्षमता पाचपट करण्याची योजना असल्याचं अर्थसचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी सांगितलं. म्हणजेच पुढच्या काही दिवसात दररोज 2500 कोटी रुपये किमतीच्या पाचशेच्या नोटा छापल्या जातील. त्यामुळे दर महिन्याला 75 हजार कोटी रुपयांच्या पाचशेच्या नोटा व्यवस्थेत येतील.
Reactions

Post a Comment

0 Comments