तेच ओझे प्रेरणादायी ठरू शकते. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, April 19, 2018

तेच ओझे प्रेरणादायी ठरू शकते.

उन्नाव आणि कठुआमधील घटना मानवतेला काळिमा फासणार्‍या तसेच राज्यकर्त्यांची संवेदनशून्यता दर्शवणार्‍या होत्या.  देश आणि स्त्रियांसंदर्भातील हे नकारात्मक चित्र कुणाही संवेदनशील माणसाला अस्वस्थ करणारे आहे आणि गुन्हेगारांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणे हा त्यावरचा उपाय आहे. परंतु या
नकारात्मकतेवर मात करून समाजमनाला उभारी द्यायची असेल तर त्यासाठी आजच्या घडीला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील यशाइतके दुसरे कोणतेही माध्यम ठरू शकत नाही. या स्पर्धेतील भारताची एकूण कामगिरी चांगली असली तरी डांगोरा पिटावा एवढी देदीप्यमान म्हणता येणार नाही. कोणत्याही स्पर्धेतील कामगिरीची तुलना अन्य देशांशी नव्हे तर त्या स्पर्धेतील स्वत:च्याच आधीच्या कामगिरीशी करणे आवश्यक असते. त्या दृष्टिकोनातून विचार केला, तर २०१० साली दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील कामगिरीच्या जवळपासही भारताला पोहोचता आलेले नाही. पदकतालिकेत भारताने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडपाठोपाठ तिसरा क्रमांक मिळवला असला तरी पहिल्या दोन क्रमांकावरील देशांच्या पदकांमध्ये आणि तिसर्‍या क्रमांकामधील अंतरही खूप आहे. ऑस्ट्रेलियाने ८० सुवर्णपदकांसह एकूण १९८ तर इंग्लंडने ४५ सुवर्णपदकांसह एकूण १३६ पदकांची कमाई केली आहे. तुलनेने २६ सुवर्णपदकांसह एकूण ६६ पदके मिळवणारा भारत तिसर्‍या क्रमांकावर असला तरी खूप मागे आहे. एक समाधानाची बाब म्हणजे ऑलिम्पिकवेळी जसे निराशाजनक वातावरण असते तसे राष्ट्रकुल स्पर्धेवेळी नसते.सर्वोच्च कामगिरी करण्यासाठी वयाचा अडसर नसतो, हे या स्पर्धेने सिद्ध केले. अवघ्या पंधरा वर्षे वयाची मनू भाकर आणि अनीश भानवाला, सतरा वर्षे वयाची मेहुली घोष आणि वीस वर्षांचा भालाफेकपटू नीरज चोपडा हे नवे युथ आयकॉन म्हणून या स्पर्धेने देशासमोर आणले. भारताच्या क्रीडाक्षेत्राचे भवितव्य उज्ज्वल असल्याची ग्वाही ही तरुण मंडळी देत असतानाच दुसरीकडे अनुभवी खेळाडूंच्या यशाने जिद्दीचा वेगळा मानदंड निर्माण केला. वाढते वय आपल्या यशामध्ये अडथळा निर्माण करू शकत नाही, हे मेरी कोम, सुशीलकुमार, मधुरिका पाटकर यांनीही दाखवून दिले. त्याचप्रमाणे मधला काही काळ स्पर्धेपासून सूट्टी घेतलेल्या तेजस्विनी सावंतने एक सुवर्ण आणि एक रौप्य असा पदकांचा डबल धमाका करून क्रीडाक्षेत्रात अनुभवही महत्त्वाचा असतो, हे दाखवून दिले. टेनिस कोर्टवरची फुलराणी सायना नेहवालने ऑलिम्पिक पदकविजेत्या पी. व्ही. सिंधूचा पराभव करून आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले. राहुल आवारेने सुवर्णपदक मिळवून महाराष्ट्रातील कुस्तीत आंतरराष्ट्रीय पातळीवर धडक देण्याची क्षमता असल्याचे दाखवून दिले. राष्ट्रकुल स्पर्धेतील अशा अनेक व्यक्तिगत यशापयशाच्या कहाण्या सांगता येतील, परंतु त्याहीपलीकडे जाऊन एकूण देशाच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडताना वर्तमानाबरोबरच भविष्याचा विचार करावा लागतो. देशात एकूण क्रीडासंस्कृती रुजवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी अनेक पातळीवर प्रयत्न व्हावे लागतात. शिक्षण संस्था, क्रीडा संघटना, सरकार आणि समाज अशा सर्व घटकांची ती जबाबदारी असते. एकीकडे क्रिकेटसारख्या खेळाचे स्तोम आणि ग्लॅमर वाढत असताना बाकीच्या खेळांकडे सगळ्याच घटकांचे दुर्लक्ष होते. त्यांच्यासाठी किमान सुविधा पुरवण्याकडेही लक्ष दिले जात नाही आणि ऑलिम्पिक, आशियाई किंवा राष्ट्रकुल अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये यशाची अपेक्षा केली जाते. ही अपेक्षा बाळगायलाच पाहिजे, खेळाडूंवर देशवासीयांच्या अपेक्षांचे ओझे असायलाच पाहिजे, ते ओझेच त्यांच्यासाठी प्रेरणादायी ठरू शकते. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages