आरोग्य विद्यापीठाच्या ’कुलगुरु संवाद यात्रा’ उपक्रमात मा. कुलगुरु यांचा थेट विद्यार्थ्यांशी संवाद - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, November 28, 2026

आरोग्य विद्यापीठाच्या ’कुलगुरु संवाद यात्रा’ उपक्रमात मा. कुलगुरु यांचा थेट विद्यार्थ्यांशी संवाद

 आरोग्य विद्यापीठाच्या ’कुलगुरु संवाद यात्रा’ उपक्रमात मा. कुलगुरु यांचा थेट विद्यार्थ्यांशी संवाद

कौशल्यपूर्ण उपक्रमांना प्राधान्य देणे गरजेचे





कोल्हापूर(कटूसत्य वृत्त ):- - बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांनी केवळ पदवीपुरते मर्यादित न राहता कौशल्यपूर्ण उपक्रमांना प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे मा. कुलगुरु    डॉ. व्यंकट गिते यांनी केले. विद्यापीठाचे संलग्नित महाविद्यालयातील विविध विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांकरीता विद्यापीठातर्फे ’कुलगुरु संवाद यात्रा’ कार्यक्रमाचे कोल्हापूर येथील राजर्षी शाहू छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजन करण्यात आले होते. याकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते उपस्थित होते. यावेळी,        मा. व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. राजकुमार पाटील, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, राजर्षी शाहू छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, विद्यापरिषदेचे सदस्य डॉ. पंकज विश्वकर्मा, अधिसभा सदस्य डॉ. डी.वाय. माळी, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. देवेंद्र पाटील, उपकुलसचिव तथा विद्यापीठाच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयाचे समन्वयक श्री. महेंद्र कोठावदे, उपकुलसचिव श्री. प्रकाश पाटील, जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच दुरस्थ पध्दतीने परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, श्री. संदीप राठोड, डॉ. महेंद्र पटाईत  उपस्थित होते.
       याप्रसंगी विद्यापीठाचे मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधल्याने त्यांच्या अडचणी समजून त्वरीत अंमलबजावणी करणे शक्य होते. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. आरोग्य क्षेत्रात झपाटयाने नवनवीन तंत्रज्ञान आणि उपचारपध्दती येत आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्ये, संवादकौशल्य, नेतृत्वगुण आणि संशोधनाची वृत्ती विकसित होणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यासाठी विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांच्या माध्यमातून कौशल्यविकास व प्रात्यक्षिकांवर भर देणाऱ्या उपक्रमांना प्राधान्य दिले जाईल असे त्यांनी सांगितले.
 ते पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांंनी शॅार्टकट टाळून प्रामाणिक कष्ट व पारदर्शकता जपली पाहिजे. विद्यापीठाचे राज्यात सुमारे अकराशेपेक्षा अधिक महाविद्यालये संलग्नित असून, देशातील हे एक मोठे आरोग्य विद्यापीठ आहे. राज्याच्या आरोग्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सर्व शाखांना समान संधी देणे आणि विद्यार्थ्यांनी जीवनात येणाऱ्या अडचणींवर मात करुन पुढे जाणे आवश्यक आहे. सातत्यपूर्ण कष्ट, प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता हीच खरी यशाची ताकद आहे. दुष्काळामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून विद्यापीठाने ४५ कोटी रुपयांचे परीक्षा शुल्क माफ केले असून, आयुर्वेदसह सर्व शाखांना समान संधी देण्यावर भर दिला जात आहे. संशोधनाला चालना देण्यासाठी विद्यापीठ सदैव विद्यार्थ्यांच्या पाठीशी असून, आगामी काळात महाविद्यालयांचे रॅकिंग सुरु करण्यात येणार आहे. ’मानसिक आरोग्य व व्यसनमुक्तीः ’नशामुक्त भारत’, ’मोबाईल फोनचा अतिरिक्त गैरवापर’, ’युवाशक्ती व राष्ट्रनिर्माण’ आणि ’मानसिक आरोग्य’ या विषयांवर सर्व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांसाठी व्याख्याने आयोजित करावीत, असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी मा. व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. राजकुमार पाटील यांनी सांगितले की, शिक्षण केवळ पुस्तकी नसावे, तर ते विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सक्षम बनवणारे असावे. संशोधन आणि नवीन कल्पनांचा प्रत्यक्ष वापर होण्यासाठी विविध उपक्रम विद्यापीठाकडून सुरु करण्यात आले आहेत त्याचा उपयोग विद्यार्थ्यांनी करावा. क्रीडा व कला क्षेत्रातही आरोग्य शिक्षणातील विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी महाविद्यालयांनी प्रोत्साहित करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
 याप्रसंगी कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, या उपक्रमामुळे आम्हाला विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या आणि त्यांच्या करिअरच्या अपेक्षा समजून घेता आल्या. या ’कुलगुरु संवाद यात्रा’ उपक्रमात विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने सहभाग घेतला आणि आपल्या समस्या, सूचना व विचार मनमोकळेपणाने मांडले. या थेट संवादामुळे विद्यापीठ प्रशासन आणि विद्यार्थी यांच्यातील दरी कमी होण्यास मदत होते असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी राजर्षी शाहू छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे यांनी सांगितले की, संवाद म्हणजे केवळ बोलणे नव्हे, तर एकमेकांना समजून घेणे, प्रश्न मांडणे, विचारांची देवाणघेवाण करणे आणि सामूहिक प्रगतीचा मार्ग शोधणे होय. ज्या संस्थेत संवाद जिवंत असतो, तिची प्रगती कधीच थांबत नाही. वैद्यकीय महाविद्यालयातून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी केवळ उत्कृष्ट डॅाक्टर नव्हे, तर संवेदनशील आणि ’उत्कृष्ट माणूस’ घडला पाहिजे असे त्यांनी सांगितले.
      याप्रसंगी प्रास्ताविकात उपकुलसचिव श्री. महेंद्र कोठावदे यांनी सांगितले की, माननीय कुलगुरुंनी पदभार स्वीकारल्यानंतर ’विद्यार्थी केंद्रबिदू’ ही संकल्पना जाहीर केली आहे. नाशिक येथून कोल्हापूर, नागपूरसह संपूर्ण राज्यातील नियंत्रण करताना येणाऱ्या अडचणी आणि विद्यार्थ्यांची अनभिज्ञता दूर करत, विद्यार्थ्यांच्या सूचनांमधूनच उपाय शोधणे हा या संवाद यात्रेचा हेतू आहे. स्वतंत्र चार एकर जागा उपलब्ध झाली असून, तेथे अद्ययावत सुविधा उभारुन प्रभावी सेवा दिली जाईल असे त्यांनी सांगितले.  
      यावेळी विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. देवेंद्र पाटील यांनी सांगितले की, ’कुलगुरु संवाद’ च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या गरजा समजून घेऊन त्यानुसार नवीन योजना आखण्यास मदत होते. विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. क्रीडा, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमहत्व विकासाला चालना दिली जाते असे त्यांनी सांगितले.
      या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले तसेच विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. देवेंद्र पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. पर्यावरण संवर्धनाचा जागर करण्याच्या हेतूने कार्यक्रमाच्या प्रारंभी मा. कुलगुरु यांनी रोपटयाला जलार्पण केले. या कार्यक्रमास कोल्हापूर येथील संलग्नित महाविद्यालयातील सातशे पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला तसेच या कार्यक्रमास शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते.
       या कार्यक्रमासाठी श्री. अविनाश सोनवणे, श्री. अर्जुन नागलोत, श्री. पुष्कर त`हाळ, श्री. कृष्णा भवर, श्री. सोहम वान्हेरे यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages