वाचनातूनच घडणार उद्याचे नेतृत्व; तरुणांनी अधिकाधिक पुस्तके वाचावीत – ऋषभ शाह - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, November 27, 2026

वाचनातूनच घडणार उद्याचे नेतृत्व; तरुणांनी अधिकाधिक पुस्तके वाचावीत – ऋषभ शाह

 

वाचनातूनच घडणार उद्याचे नेतृत्व; तरुणांनी अधिकाधिक पुस्तके वाचावीत – ऋषभ शाह

मुंबई पुस्तक महोत्सवात युवा पिढीशी साधला संवाद; वाचनामुळे ज्ञान, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्वाला मिळते नवी दिशा


मुंबई(कटूसत्य वृत्त):- वाचन ही केवळ माहिती मिळविण्याची प्रक्रिया नसून स्वतःला अधिक ज्ञानी, सक्षम आणि आत्मविश्वासपूर्ण बनविण्याचा प्रभावी मार्ग आहे. आजच्या तरुण पिढीमध्ये प्रचंड क्षमता असून, देशाचे भविष्य घडविण्याची ताकद युवा पिढीत आहे. त्यामुळे तरुणांनी अधिकाधिक पुस्तके वाचावीत, स्वतःच्या आवडीचे साहित्य शोधावे आणि ज्ञानाची कक्षा सातत्याने विस्तारावी, असे आवाहन ऋषभ शाह यांनी केले.

मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात आयोजित मुंबई पुस्तक महोत्सव-२०२६ अंतर्गत ‘युवा शक्ती घडवणार भविष्याची दिशा’ या विषयावर आयोजित संवाद सत्रात ते बोलत होते. यावेळी त्यांनी उपस्थित युवा विद्यार्थ्यांशी विविध विषयांवर संवाद साधत त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. ऋषभ शाह हे मुंबईस्थित युवा उद्योजक, लेखक, शिक्षणतज्ज्ञ आणि प्रेरणादायी वक्ते आहेत. ते इंडियाज इंटरनॅशनल मूव्हमेंट टू युनाइट नेशन्स (आयआयएमयूएन) या युवा संघटनेचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. नॅशनल बुक ट्रस्टचे संचालक कॅप्टन युवराज मलिक यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

युवा पिढीला संदेश देताना शाह म्हणाले की, आजची तरुण पिढी अत्यंत बुद्धिमान, कल्पक आणि नव्या संधींचा वेध घेणारी आहे. भारताला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देण्यात तरुणांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे तरुणांना सल्ला देण्यापेक्षा त्यांच्यातील क्षमता ओळखून त्यांना वाचनाची प्रेरणा देणे अधिक महत्त्वाचे आहे. ‘वाचा, शक्य तितके वाचा’ असा संदेश त्यांनी यावेळी तरुणांना दिला.

भारताच्या २०४७ पर्यंतच्या विकासप्रवासाबाबत विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी अर्थव्यवस्था, आरोग्यसेवा आणि शिक्षण या तीन क्षेत्रांचे महत्त्व अधोरेखित केले. या क्षेत्रांमध्ये अधिकाधिक संधी, सर्वसमावेशक विकास आणि गुणवत्तापूर्ण सुविधा निर्माण होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विकसित भारताच्या संकल्पनेत या तीन क्षेत्रांचा महत्त्वपूर्ण वाटा असेल, असेही त्यांनी नमूद केले.वाचनाची सवय लावण्यासाठी कोणती प्रेरणा असावी, या एका विद्यार्थ्याच्या प्रश्नावर शाह यांनी वाचनामुळे व्यक्तिमत्व अधिक समृद्ध होते, असे सांगितले. समाजात आत्मविश्वासाने वावरताना विषयांचे सखोल ज्ञान आणि विचारांची स्पष्टता उपयोगी ठरते. समाजमाध्यमांमधून तात्पुरती लोकप्रियता मिळू शकते; मात्र पुस्तकांच्या वाचनातून मिळणारे ज्ञान आणि समज आयुष्यभर उपयोगी पडते. त्यामुळे स्वतःला अधिक ज्ञानी बनविणे हीच वाचनाची सर्वात मोठी प्रेरणा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

एका विद्यार्थिनीने कोणत्या प्रकारची पुस्तके वाचावीत, असा प्रश्न विचारला असता त्यांनी वाचनाची सुरुवात स्वतःच्या आवडीनुसार करण्याचा सल्ला दिला. इतिहास, काल्पनिक साहित्य, कथा, कादंबऱ्या किंवा अन्य कोणत्याही विषयात रस असेल, तर त्याच विषयातील पुस्तकांपासून सुरुवात करावी. आवडीच्या विषयातून वाचनाची गोडी निर्माण झाल्यानंतर वाचनाचा आवाका आपोआप वाढत जातो, असे त्यांनी सांगितले.समाजमाध्यमांमुळे वाचनात निर्माण होणाऱ्या व्यत्ययांबाबत बोलताना त्यांनी आजच्या डिजिटल युगात एकाग्रता टिकविणे हे एक मोठे आव्हान असल्याचे सांगितले. मात्र, प्रत्येकाने स्वतःला अनुरूप अशी वाचनपद्धती विकसित करावी. एकाच वेळी वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तके वाचण्याचाही प्रयोग करता येऊ शकतो. छोट्या पुस्तकांपासून सुरुवात करून नियमित वाचनाची सवय विकसित करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई पुस्तक महोत्सवाच्या माध्यमातून युवा पिढीला लेखक, साहित्य, विचार आणि ज्ञानाच्या विविध प्रवाहांशी जोडण्याचा प्रयत्न होत असून, ऋषभ शाह यांच्या संवादातून वाचनाचे महत्त्व आणि भविष्य घडविण्यात तरुणांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages