संरक्षित सिंचन शेती क्षेत्रातील प्रश्न सोडविण्यावर भर – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, November 18, 2026

संरक्षित सिंचन शेती क्षेत्रातील प्रश्न सोडविण्यावर भर – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

 

संरक्षित सिंचन शेती क्षेत्रातील प्रश्न सोडविण्यावर भर – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे





मुंबई(कटूसत्य वृत्त):- संरक्षित सिंचन शेती क्षेत्रातील शेतकरी, हरितगृह व शेडनेट उत्पादक, उद्योजक तसेच सेवा पुरवठादारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी कृषी विभाग सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. या क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासोबतच संबंधित घटकांना भेडसावणारे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्यात येतील, अशी ग्वाही कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

‘इंडियन ग्रीन हाऊस मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन’ च्या वतीने संरक्षित शेती आणि सिंचन क्षेत्रातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली फलोत्पादन विभाग आणि कृषी आयुक्तालय, पुणे यांच्या वतीने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी सचिव परिमल सिंह,ऑनलाईन आयुक्त सूरज मांढरे, प्रकल्प संचालक मीनल करनवाल, ‘इंडियन ग्रीन हाऊस मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन’चे  मनोज मानगावे, चेतन दहीया यासह सदस्य बैठकीला उपस्थित होते.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत केंद्र शासनाकडून वाढीव निधी मिळविण्यासाठीही पाठपुरावा सुरू आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प तसेच कृषी समृद्धी योजना यांसारख्या विविध शासकीय योजनांमध्ये संरक्षित शेतीचा समावेश करण्याबाबत संबंधितांना अवगत करण्यात येत आहे. या माध्यमातून संरक्षित सिंचन क्षेत्रातील शेतीचा विस्तार आणि शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळवून देण्यावर भर देण्यात येत आहे.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, जालना जिल्ह्यात काळ्या यादीत टाकण्यात आलेल्या ४४ सेवा पुरवठादारांना नैसर्गिक न्यायाच्या तत्वानुसार लेखी स्वरूपात बाजू मांडण्याची संधी देण्यात आली असून, फलोत्पादन संचालनालयामार्फत त्यांची पुन्हा सुनावणी घेण्याचे प्रस्तावित आहे. मार्गदर्शक सूचनांनुसार संरक्षित सिंचन शेतीअंतर्गत फळे, भाजीपाला, फुले, मसाला पिके तसेच औषधी वनस्पतींचा समावेश, जुन्या हरितगृह आणि शेडनेटच्या दुरुस्तीचे प्रश्न आदी विषयांवरही यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, संरक्षित शेती सिंचन क्षेत्रातील शेतकरी, उद्योजक, उत्पादक आणि सेवा पुरवठादार यांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यास कृषी विभाग प्राधान्य देणार आहे. या बैठकीच्या माध्यमातून संबंधित घटकांचे विविध प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages