पालक, शिक्षक आणि समाजाची मुलींना समजून घेण्याची जबाबदारी- प्रा. विशाल गरड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, October 22, 2026

पालक, शिक्षक आणि समाजाची मुलींना समजून घेण्याची जबाबदारी- प्रा. विशाल गरड

 पालक, शिक्षक आणि समाजाची मुलींना समजून घेण्याची जबाबदारी- प्रा. विशाल गरड




अकलूज (कटूसत्य वृत्त):- “गुण म्हणजे गुणवत्तेचा एकमेव निकष नाही. पालकांनी मुलांना संपत्तीत मोजू नये; आपलं लेकरू हीच खरी संपत्ती आहे. मुलींशी मनमोकळेपणाने संवाद साधला, त्यांच्याशी आपुलकीने वागलो, तरच त्यांचं भावविश्व समजून घेता येईल,” असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते तथा लेखक प्रा. विशाल गरड यांनी केले.

जिजामाता कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, अकलूज यांच्या वतीने शंकरनगर येथील स्मृतिभवन येथे ‘मुलींना समजून घेताना – पालक, शिक्षक व समाज’ या विषयावर पालक मेळावा व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक व्यवस्थापन समितीच्या सभापती स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात प्रा. गरड यांनी उपस्थित पालक, शिक्षक आणि विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष तथा प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुनीता वाघ, स्थानिक व्यवस्थापन समितीच्या सदस्या मीनल धनंजय माने-देशमुख, उपप्राचार्य प्रा. तावरे आणि पर्यवेक्षक संतोष अनगळ उपस्थित होते.

मुलांशी संवाद साधा, त्यांच्यावर विश्वास ठेवा!

समाजात होत असलेले बदल, त्यांचा मुलांवर होणारा परिणाम, पालक व शिक्षकांची जबाबदारी आणि मुला-मुलींनी घ्यावयाची काळजी याविषयी प्रा. गरड यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. आज मुला-मुलींना पालक, शिक्षक आणि समाजाबद्दल काय वाटते, हे जाणून घेण्याचा प्रयत्न फारसा होत नाही. मुलांना केवळ गुणांच्या आधारे तोलले जाते. मात्र, गुणांपेक्षा त्यांच्यातील कौशल्ये, क्षमता आणि व्यक्तिमत्त्व विकासाला महत्त्व देणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

पालकांनी स्वतः व्यसनांपासून दूर राहून मुलांसमोर आदर्श निर्माण करावा. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत. विशेषतः मुलींशी मनमोकळेपणाने संवाद साधून त्यांच्या भावना, अडचणी आणि अपेक्षा समजून घ्याव्यात. मुलांकडून चुका झाल्यास त्यांना त्या सुधारण्याची संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

मुलींचे आरोग्य जपण्यासाठी योग्य आहार आणि सुरक्षित वातावरण महत्त्वाचे आहे. मुलींना केवळ वाढवणे आणि त्यांना सक्षमपणे घडवणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे पालकांनी त्यांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष द्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिक्षकांप्रती आदराची भावना निर्माण करा!

शिक्षकांच्या जबाबदारीविषयी बोलताना प्रा. गरड यांनी शिक्षकांवर असलेल्या शालाबाह्य कामांच्या वाढत्या ताणाबद्दल खंत व्यक्त केली. समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असून, आज समाजाला परिवर्तन घडवणाऱ्या शिक्षकांची नितांत गरज आहे, असे ते म्हणाले.

विद्यार्थ्यांना शिस्त लावताना शिक्षकांना पालकांचे सहकार्य मिळणे आवश्यक आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केल्यास काही पालक शाळेत येऊन शिक्षकांशी अयोग्य वर्तन करतात. असे प्रकार टाळण्यासाठी पालकांनी शाळेत येताना प्रतिष्ठेचा किंवा अहंकाराचा आव न आणता शिक्षकांशी सहकार्याची भूमिका ठेवावी. विद्यार्थ्यांसमोर शिक्षकांविषयी आदराची भावना निर्माण करावी, असे आवाहन त्यांनी केले.

प्रतिकूल परिस्थितीत मुलींसाठी शिक्षणाची दारे खुली करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून पालक आणि शिक्षकांनी मुला-मुलींवर प्रेम करावे व त्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी मदत करावी, असेही त्यांनी सांगितले.

समाज हेच मुलांसाठी मोठे विद्यापीठ!

मुलींच्या सुरक्षिततेबाबत समाजाची जबाबदारी अधोरेखित करताना प्रा. गरड म्हणाले की, मुलांसाठी गल्ली आणि समाज हेच मोठे विद्यापीठ असते. समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपले कर्तव्य जबाबदारीने पार पाडले, तर भावी पिढी सुजाण आणि जबाबदार बनेल.

मोबाईल हा ज्ञान मिळविण्याचे प्रभावी साधन असला, तरी त्याचा गैरवापर नुकसानकारक ठरू शकतो. त्यामुळे पालकांनी मुलांना दिलेल्या सुविधांचा योग्य वापर करण्याची जाणीव करून द्यावी. मुलींनीही मोबाईलचा वापर शिक्षण, ज्ञान आणि यश संपादनासाठी करावा, असा सल्ला त्यांनी दिला.

चेहऱ्यापेक्षा ज्ञानाचा मेकअप करा!

विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना प्रा. गरड यांनी स्वतःचा स्वीकार करण्याचे आणि आत्मविश्वासाने जगण्याचे आवाहन केले. त्वचेचा रंग किंवा बाह्यरूप यापेक्षा ज्ञान, कर्तृत्व आणि व्यक्तिमत्त्व यांमुळे माणसाची खरी ओळख निर्माण होते. आईच्या उदरातून मिळालेला त्वचेचा रंग कोणत्याही दुसऱ्या रंगापेक्षा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसतो. त्यामुळे चेहऱ्याच्या मेकअपपेक्षा मनाचा आणि ज्ञानाचा मेकअप करा. सौंदर्यप्रसाधनांवर खर्च करण्याऐवजी पुस्तकांवर खर्च केला, तर यशाच्या दिशेने वाटचाल करणे अधिक सोपे होईल, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.

मुलींनी कायद्याची माहिती करून घेत अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा आणि वाईट प्रवृत्तींपासून स्वतःचे संरक्षण करावे. शिक्षणावर लक्ष केंद्रित करून बौद्धिकदृष्ट्या सक्षम व्हावे. जीवनातील निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येक मुलीला आहे; मात्र त्यासाठी स्वतःला सक्षम बनवणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

विवाहाचा निर्णय घेताना केवळ संपत्ती न पाहता मुलाचे ज्ञान, आरोग्य आणि स्वभाव यांना महत्त्व द्यावे. व्यसनाधीन व्यक्तींपासून सावध राहावे, कृत्रिम पेयांचे सेवन टाळावे आणि खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अथवा स्तुतीच्या मोहात अडकू नये, असा मौलिक सल्लाही त्यांनी विद्यार्थिनींना दिला.

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी सावित्रीबाईंचा विचार घराघरांत पोहोचवा!

समाजातील स्त्रीभ्रूणहत्येच्या गंभीर प्रश्नावर भाष्य करताना प्रा. गरड यांनी मुली मुलांपेक्षा कमी नाहीत, ही भावना समाजात रुजविण्याची गरज व्यक्त केली. आपल्या भाषणात त्यांनी शासकीय आकडेवारीचा दाखला देत गर्भातच मुलींची हत्या होण्याच्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली. प्रत्येक घरात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा फोटो असावा आणि त्यांच्या विचारांचा अंगीकार केला जावा, असे आवाहन त्यांनी केले.

मुलींनी मोठी स्वप्ने पाहावीत, ध्येय निश्चित करावे आणि ते साध्य करण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करावेत. आईच्या मायेची आणि वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवून शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचे भविष्य घडविण्याचा निर्धार करावा, असे आवाहनही त्यांनी विद्यार्थिनींना केले.

मुलींच्या भावना समजून घेणे महत्त्वाचे!

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मुख्याध्यापिका सुनीता वाघ यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक, पालक आणि समाज यांच्यातील समन्वय महत्त्वाचा असल्याचे सांगितले. मुलींच्या भावनांचा आदर करून त्यांच्या स्वप्नांना योग्य दिशा देणे आवश्यक आहे. मुलींना सतत सूचना देण्यापेक्षा त्यांचे म्हणणे ऐकून घेणे अधिक महत्त्वाचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. किरण सूर्यवंशी आणि प्रा. आर. आर. पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. संतोष अनगळ यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages