“शासकीय काम करताना निव्वळ नोकरी नको तर अंतःकरणापासून जनसेवा करा” – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अधिकाऱ्यांना आवाहन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, October 17, 2026

“शासकीय काम करताना निव्वळ नोकरी नको तर अंतःकरणापासून जनसेवा करा” – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अधिकाऱ्यांना आवाहन

 

“शासकीय काम करताना निव्वळ नोकरी नको तर अंतःकरणापासून जनसेवा करा” – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अधिकाऱ्यांना आवाहन

  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रशासकीय यंत्रणेचे कौतुक


 ठाणे     (कटूसत्य वृत्त):- ठाणे जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि विविध शासकीय विभागांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आलेल्या ‘सेवा संकल्प अभियाना’ने जिल्ह्यात यशाचा नवा टप्पा गाठला आहे. आरोग्य, शिक्षण, कृषी, महिला व बालविकास आणि समाजकल्याण यांसारख्या विविध महत्त्वाच्या विभागांनी एकत्र येत तब्बल १,०५६ उपक्रम यशस्वीपणे राबवून हजारो नागरिकांना थेट शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पार पडलेल्या भव्य कार्यक्रमात, हे अभियान अत्यंत यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याचे सांगत उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी सर्व विभागांच्या या कामगिरीचे कौतुक केले.

याप्रसंगी खासदार नरेश म्हस्के, आमदार रविंद्र फाटक, बदलापूर नगराध्यक्षा रुचिता घोरपडे, कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने यांच्यासह विविध शासकीय विभागांचे विभाग प्रमुख आणि कार्यालय प्रमुख उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, या अभियानांतर्गत जिल्हाभरात आरोग्य तपासणी शिबिरे, आशा स्वयंसेविकांसाठी प्रशिक्षण, करिअर मार्गदर्शन, ‘फिट इंडिया’ अंतर्गत क्रीडा स्पर्धा, शालेय गणवेश, खुर्च्या व वॉटर कुलर वाटप, स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण तसेच विविध आवश्यक दाखल्यांचे वाटप करण्यात आले. याशिवाय ‘बिरसा मुंडा’ आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन’ योजनांअंतर्गत लाभार्थ्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन पुरवण्यात आले.

प्रशासकीय यंत्रणांनी शहापूर, मुरबाड आणि भिवंडी या ग्रामीण व आदिवासी भागांतील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी घोंगडी बैठकांच्या माध्यमातून थेट पाड्यांवर जाऊन नागरिकांशी संवाद साधला. माहितीअभावी किंवा कागदपत्रांच्या तांत्रिक अडचणींमुळे कोणताही गरजू नागरिक लाभापासून वंचित राहू नये, यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अत्यंत सौजन्याने आणि आत्मियतेने कार्य केले, असे सांगून ते पुढे म्हणाले की, हे अभियान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यप्रणालीतून प्रेरणा घेऊन राबवण्यात आले होते. देशसेवेचा हा संकल्प केवळ एका अभियानापुरता मर्यादित न ठेवता ती एक निरंतर चालणारी प्रक्रिया म्हणून पुढेही सुरू ठेवली जाणार आहे. सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि कष्टकऱ्यांना दिलासा देणे हाच शासनाचा मुख्य उद्देश असून, दुष्काळी परिस्थितीत ग्रामीण भागातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी शासन खंबीरपणे पाठीशी उभे आहे. याच वेळी त्यांनी शहरी भागातील नागरिकांनी आणि सामाजिक संस्थांनीदेखील या काळात मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन केले.

शासकीय कामकाज करताना अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निव्वळ नोकरी न करता अंतःकरणापासून जनसेवा केली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ‘ग्रामगीता’ ग्रंथातील विचारांचा दाखला देत,कोणतेही कार्य मनापासून आणि सेवाभावाने केले तरच ते खऱ्या अर्थाने यशस्वी होते, याची आठवण करून देण्यात आली. अभियान संपले तरीही ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मनातील हा सेवाभाव कायम तेवत ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले. केवळ काही दिवसांचा ‘सौजन्य सप्ताह’ साजरा करून नंतर नागरिकांची अडवणूक करण्यापेक्षा कायमस्वरूपी सौजन्याची आणि संवेदनशीलतेची वागणूक देणे अत्यंत गरजेचे असून अशा सेवाभावातून जनसेवेचे मोठे पुण्य पदरी पडते, असे प्रतिपादन त्यांनी केले.

नवरात्रौत्सव हा शक्तीच्या उपासनेचा सण असून ‘सेवा संकल्प अभियाना’च्या माध्यमातून या शक्तीचा उपयोग लोककल्याणासाठी केला जात आहे. नवरात्रीची ऊर्जा आणि नवदुर्गांची प्रेरणा घेऊन प्रत्येक पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवण्याचा संकल्प अधिक बळकट करण्यात येत आहे. येत्या चार दिवसांवर आलेल्या विजयादशमी आणि दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर सर्वांना शुभेच्छा देत, यंदाचा दसरा आणि पुढील सात-आठ महिने दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या जीवनात आनंदाचे तोरण बांधण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचा ठाम निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्ह्यातील विविध भागांमधून आलेल्या लाभार्थ्यांना विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभही देण्यात आला. यामध्ये विशेष बाब म्हणजे जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी (DMFT) मार्फत आदिवासी आश्रमशाळेतील आठवी ते दहावीच्या मुलींना सायकलींचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या निरनिराळ्या उपक्रमांची संक्षिप्त माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साधना जोशी यांनी केले, तर आभार प्रदर्शन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages