छत्रपती शिवाजी रात्र कला व वाणिज्य महाविद्यालय,सोलापूर येथे वाचन प्रेरणा दिन साजरा
जागरूक समाज निर्मितीसाठी वाचन चळवळ उभा राहणे गरजेचे - लेखक किशोर जाधव
छत्रपती शिवाजी कला आणि वाणिज्य रात्र महाविद्यालय, सोलापूर येथे भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त 'वाचन प्रेरणा दिन' साजरा करण्यात आला. यानिमित्त लेखक किशोर जाधव यांचे "जागरूक समाजासाठी वाचन " या विषयावर व्याख्यान आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन मोटे होते. यावेळी मराठी विभाग प्रमुख डॉ.प्रा.अभिमन्यू ओहळ, इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. प्रा.गायकवाड यांच्यासह प्रा.गवळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमा पूजनाने सुरू झालेल्या या कार्यक्रमात पुस्तक दान पेटीत मान्यवरांच्या हस्ते पुस्तके दान करण्यात आली.
आपल्या व्याख्यानात किशोर जाधव म्हणाले, " भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्म एका साध्या कुटुंबात झाला. गरिबीवर मात करत त्यांनी शिक्षण पूर्ण केले आणि आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर भारताला अंतराळ आणि संरक्षण क्षेत्रात महासत्ता बनवण्यात मोलाचे योगदान दिले. त्यांचे संपूर्ण आयुष्य देशाच्या सेवेसाठी समर्पित होते. त्यांच्या जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिन हा स्तुत्य उपक्रम शासनाने सुरू केला आहे.वाचनाने व्यक्तीमध्ये बुद्धिमत्ता, कौशल्य,सदसदविवेक बुद्धी, चिकित्सवृती आणि स्वाभिमान जागृत होतो. अंधश्रद्धा दूर होऊन वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागतो. वाचनाच्या आवडीतून लेखन कौशल्य विकसित होते. आज सोशल मीडियाच्या काळात वाचन कमी झाले आहे. तरुण वर्ग रील, मोबाईल गेम्स याच्यामध्ये आपला फार मोठा किंमती वेळ वाया घालवत आहे. तरुणांना पुस्तक वाचनाकडे वळवण्यासाठी जाणीवपूर्वक काही उपक्रम हाती घेतले पाहिजेत. ' वाचाल तर वाचाल ' हा जयघोष देत, जागरूक समाज निर्मितीसाठी वाचन चळवळ उभी केली गेली पाहिजे. " या शब्दात आपले मत व्यक्त केले.
अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. नितीन मोटे म्हणाले की, "आपण ज्या प्रकारची पुस्तकं वाचतो त्या प्रकारे आपण घडत जातो. म्हणून दर्जेदार पुस्तक वाचनाची सवय आपण स्वतःला लावून घेतली पाहिजे. थोर व्यक्तींची जीवन चरित्रे, त्यांचा संघर्ष, त्यांची आत्मचरित्रे आपण वाचली पाहिजेत. देशाचा, जगाचा आणि आपल्या स्थानिक प्रदेशाचा इतिहास आपण वाचून काढला पाहिजे. शास्त्रज्ञांची चरित्रे आणि त्यांनी लावलेले शोध आणि विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरणावरील पुस्तके आपण हमखास वाचली पाहिजेत. महाविद्यालयाने सुरू केलेल्या पुस्तक पेटीत सर्वांनी जास्तीत जास्त पुस्तकांचे दान करून महाविद्यालयात वाचन संस्कृती रुजवण्यासाठी मदत करावी. महाविद्यालयाने सुरू केलेल्या अभ्यासिकेत दररोज जास्तीत वेळ बसून ग्रंथालयातील पुस्तकांचे अवांतर वाचन करावे." या शब्दात आपले मत व्यक्त केले.
कार्यक्रमाची सांगता महाविद्यालयाने नव्याने सुरू केलेल्या अभ्यासिकेच्या उद्घाटन कार्यक्रमाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. नवनाथ पाटोळे यांनी केले. तर आभार प्रा. डॉ. हरिचंद्र मोरे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment