पेनूर-कोन्हेरी रस्त्यावरील धोकादायक खड्डा तात्काळ बुजवा
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- पेनूर-कोन्हेरी रस्त्यावर रस्त्यालगत मोठे भगदाड व खड्डा निर्माण झाल्याने रस्त्याची कड अत्यंत धोकादायक बनली आहे. या ठिकाणी मातीची धूप झाल्यामुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, संभाव्य अपघात टाळण्यासाठी खड्डा तात्काळ बुजवून रस्त्याची कड मजबूत करावी, अशी मागणी शरद जोशी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत संघटनेचे अध्यक्ष नितीन जरग यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मोहोळ येथील कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे.
पेनूर-कोन्हेरी मार्गावरून नागरिक, विद्यार्थी, दुचाकीस्वार तसेच इतर वाहनांची नियमित वर्दळ असते. विशेषतः रात्रीच्या वेळी हे धोकादायक भगदाड व खड्डा वाहनचालकांच्या सहज निदर्शनास न आल्यास गंभीर अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित विभागाने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून खड्डा शास्त्रोक्त पद्धतीने बुजवावा, रस्त्याची कड मजबूत करावी तसेच आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतरही कार्यवाही न झाल्यास आणि त्यानंतर अपघात अथवा जीवितहानी झाल्यास, रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या यंत्रणेच्या निष्काळजीपणाबाबत वरिष्ठ प्राधिकरणाकडे तक्रार करण्यासह उपलब्ध कायदेशीर उपाययोजना करण्याचा इशाराही शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष नितीन जरग यांनी दिला आहे.


No comments:
Post a Comment