मॅग्नेट २.० मुळे कृषी-व्यवसाय क्षेत्रात मोठी गुंतवणूक आकर्षित होईल – मंत्री जयकुमार रावल - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, September 15, 2026

मॅग्नेट २.० मुळे कृषी-व्यवसाय क्षेत्रात मोठी गुंतवणूक आकर्षित होईल – मंत्री जयकुमार रावल

मॅग्नेट २.० मुळे कृषी-व्यवसाय क्षेत्रात मोठी गुंतवणूक आकर्षित होईल – मंत्री जयकुमार रावल




 मुंबई(कटूसत्य वृत्त):-  राज्यातील कृषी-व्यवसाय क्षेत्रासाठी आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्यास आणि मोठ्या प्रमाणावर खाजगी गुंतवणूक आकर्षित करण्यास चालना देणाऱ्या ‘मॅग्नेट ॲग्रीबिझनेस इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टर मीट’ या गुंतवणूकदार मेळाव्याचे आयोजन बुधवार, दि. १६ सप्टेंबर रोजी मुंबई येथे करण्यात आले असून, या उपक्रमामुळे महाराष्ट्राच्या कृषी-व्यवसाय क्षेत्राला नवी दिशा मिळेल, असा विश्वास पणन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे अध्यक्ष जयकुमार रावल यांनी व्यक्त केला.

पणन मंत्री रावल म्हणाले की, शेतकऱ्यांच्या उत्पादनाला अधिक व्यापक बाजारपेठ, दर्जेदार प्रक्रिया सुविधा आणि आधुनिक कृषी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे हा मॅग्नेट २.० प्रकल्पाचा प्रमुख उद्देश आहे. राज्यातील कृषी-व्यवसाय क्षेत्रात खाजगी गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण निर्माण करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी भक्कम मूल्यसाखळी उभारण्याचे काम या प्रकल्पातून केले जात आहे.

आशियाई विकास बँकेच्या अर्थसहाय्याने राबविण्यात येत असलेल्या महाराष्ट्र ॲग्रिबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पांतर्गत राज्यातील प्रमुख फळपिके तसेच विविध कृषी उत्पादनांसाठी उत्पादन, प्रक्रिया, साठवणूक, शीतसाखळी, लॉजिस्टिक्स आणि विपणन यांचा समावेश असलेली एकात्मिक मूल्यसाखळी विकसित करण्यात येत आहे. विस्तारित टप्प्यात द्राक्षे, पपई, हळद, अंजीर, शेवगा, टोमॅटो, आले आणि फणस या पिकांचाही समावेश करण्यात आला आहे.

मॅग्नेट २.० अंतर्गत ‘हब-अँड-स्पोक’ मॉडेलवर आधारित मोठ्या प्रमाणावर कृषी-व्यवसाय पायाभूत सुविधा उभारण्याचा प्रस्ताव आहे. या सुविधांमुळे शेतमालाची नासाडी कमी होण्यासह अधिक चांगल्या बाजारपेठा, मूल्यवर्धनाच्या संधी आणि निर्यात बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळण्यास मदत होणार आहे. तसेच शेतकरी, उत्पादक संस्था, प्रक्रिया उद्योग, निर्यातदार आणि रिटेल क्षेत्र यांना एका मूल्यसाखळीत जोडण्याचे कामही या माध्यमातून होणार आहे.

शासनाच्या पायाभूत सुविधा उभारणीच्या प्रयत्नांना बाजारपेठेची मागणी आणि उद्योग क्षेत्राच्या गरजांची जोड देण्यासाठी या गुंतवणूकदार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात कृषी-व्यवसाय, अन्नप्रक्रिया, बँकिंग, वित्त, शीतसाखळी, लॉजिस्टिक्स, पायाभूत सुविधा विकास आणि स्टार्टअप क्षेत्रातील सुमारे २०० हून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या चर्चांमधून राज्यातील संभाव्य कृषी क्लस्टर्स, गुंतवणुकीच्या संधी आणि आवश्यक पायाभूत सुविधांबाबत महत्त्वपूर्ण सूचना व अभिप्राय प्राप्त होणार असल्याचे मंत्री श्री. रावल यांनी सांगितले. या मेळाव्यातून प्राप्त होणाऱ्या सूचना आणि अभिप्रायांच्या आधारे प्राधान्य कृषी क्लस्टर्स, मूल्यसाखळ्या, पायाभूत सुविधा आणि अपेक्षित गुंतवणुकीचे स्वरूप निश्चित करण्यात येणार असून, त्यानंतर खासगी क्षेत्राचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी ‘एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट’ प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

मॅग्नेट २.० च्या माध्यमातून महाराष्ट्राला केवळ कृषी उत्पादन करणारे राज्य न ठेवता प्रक्रिया, मूल्यवर्धन, आधुनिक साठवणूक, शीतसाखळी, लॉजिस्टिक्स आणि निर्यातक्षम कृषी-व्यवसायाचे प्रमुख केंद्र बनविण्याच्या दिशेने शासन प्रयत्नशील आहे. या गुंतवणूकदार मेळाव्यामुळे राज्याच्या कृषी क्षेत्रात नवीन गुंतवणूक, रोजगाराच्या संधी आणि शेतमालाला अधिक मूल्य मिळण्याच्या प्रक्रियेला निश्चितच गती मिळेल, असा विश्वास मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages