महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद; महाराष्ट्रातून ४३२ अर्ज सादर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, September 15, 2026

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद; महाराष्ट्रातून ४३२ अर्ज सादर

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद; महाराष्ट्रातून ४३२ अर्ज सादर



मुंबई(कटूसत्य वृत्त):-  महाराष्ट्र शासनाच्या पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६’साठी महाराष्ट्रभरातून ४३२ मंडळांनी अर्ज सादर केले आहेत. यामध्ये ठाणे जिल्ह्यातून सर्वाधिक ५२ अर्ज प्राप्त झाले आहेत. या स्पर्धेचा विस्तार मागील वर्षापासून तालुकास्तरापर्यंत करण्यात आला आहे.

यावर्षीपासून प्रथमच ही स्पर्धा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही विस्तारित करण्यात आली आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २५ सप्टेंबर आहे. अर्ज सादर करताना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मंडळांनी गेल्या वर्षभरात आयोजित केलेल्या गणेशोत्सव तसेच संबंधित सांस्कृतिक उपक्रमांची आणि यावर्षीच्या गणेशोत्सवाची छायाचित्रे जिओटॅगसह सादर करावयाची आहेत. आतापर्यंत राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी देशभरातील विविध शहरांतून अर्ज प्राप्त झाले आहेत. तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी जपान, श्रीलंका, जर्मनी, नायजेरिया, सिंगापूर आदी देशांतून अर्ज प्राप्त झाले आहेत. या स्पर्धेचा जागतिक विस्तार राज्य महोत्सवाला ‘ग्लोबल’ ओळख मिळवून देणारा ठरत आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवाचे पारंपरिक आणि सांस्कृतिक महत्त्व ओळखून शासनाकडून गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. मागील वर्षी या स्पर्धेच्या तसेच संबंधित अन्य उपक्रमांच्या आयोजनात व्यापक बदल करण्यात आले असून, वर्षागणिक मंडळे आणि नोंदणीकृत संस्थांचा या स्पर्धेतील सहभाग वाढत आहे.स्पर्धेचे परीक्षण अत्यंत पारदर्शक पद्धतीने करण्यात येणार आहे. सहभागी मंडळांना तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय परीक्षण समित्या प्रत्यक्ष भेट देणार आहेत. भेटीदरम्यान सहभागी मंडळांची सर्व कागदपत्रे, वर्षभरात राबविलेले उपक्रम, त्यांचे अहवाल, फोटो व व्हिडिओ, तसेच सांस्कृतिक स्पर्धा, संस्कृती आणि सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन विषयक उपक्रम, भाविकांसाठी केलेल्या सोयी-सुविधा, विविध स्पर्धा, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी राबविलेले कायमस्वरूपी तसेच उत्सवकाळातील उपक्रम, पर्यावरणपूरक मूर्ती व सजावट, प्रदूषणमुक्त वातावरण आदी विविध बाबींच्या आधारे परीक्षण करण्यात येणार आहे.

हे परीक्षण ऑनलाइन स्वरूपात करण्यात येणार असून, परीक्षकांना जिओटॅग केलेल्या छायाचित्रांद्वारे आपला निकाल सादर करावा लागणार आहे. यामुळे निकालात पारदर्शकता निर्माण होऊन स्पर्धेचे नियमन आणि नियंत्रण अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.तालुकास्तरीय प्रथम विजेत्याला २५ हजार रुपयांचे, तर जिल्हास्तरीय प्रथम, द्वितीय आणि तृतीय विजेत्यांना अनुक्रमे ५० हजार, ४० हजार आणि ३० हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे ७.५ लाख, ५ लाख आणि २.५ लाख रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत.

तसेच, घरगुती आणि सार्वजनिक गणपतीचे दर्शन घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने सर्वांना घेता यावे, यासाठी तयार करण्यात आलेले https://ganeshotsav.pldmka.co.in हे पोर्टल १४ सप्टेंबरपासून खुले होणार आहे. या पोर्टलवर सार्वजनिक मंडळे आपल्या गणपतीचे थेट आणि मोफत दर्शन जगभरातील गणेशभक्तांसाठी उपलब्ध करून देऊ शकतात. तसेच, घरगुती गणपतीची छायाचित्रेही सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देता येणार आहेत.

या राज्य महोत्सवातील सर्व उपक्रमांमध्ये मंडळांनी आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा, असे आवाहन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages