अनगर येथे लोकनेते बाबुराव (आण्णा) पाटील यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 4, 2026

अनगर येथे लोकनेते बाबुराव (आण्णा) पाटील यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी

 अनगर येथे लोकनेते बाबुराव (आण्णा) पाटील यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी




अनगर, (कटूसत्य वृत्त):- स्वर्गीय लोकनेते बाबुराव (आण्णा) पाटील यांच्या १०९ व्या जयंतीनिमित्त अनगर येथे विविध सामाजिक, शैक्षणिक व प्रेरणादायी उपक्रमांचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. यानिमित्त साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती, लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी तसेच कै. शंकरराव बाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास लोककवी प्रा. प्रशांत मोरे (मुंबई) व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकनेते बाबुराव (आण्णा) पाटील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. प्राचार्य महादेव चोपडे यांनी लोकनेते बाबुराव (आण्णा) पाटील यांच्या शैक्षणिक, सामाजिक व लोकहितवादी कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेत त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.
यावेळी लोककवी प्रा. प्रशांत मोरे यांनी आपल्या दमदार व पहाडी आवाजात आई-वडिलांवरील हृदयस्पर्शी कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. "स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी" या म्हणीचा संदर्भ देत त्यांनी आई-वडील हेच आपल्या जीवनातील खरे दैवत असल्याचे सांगितले. त्यांच्या नावाने कधीही शिवी देऊ नका, त्यांना काळजाच्या कुपीत जपून ठेवा आणि त्यांच्या प्रेमाचा, त्यागाचा व संस्कारांचा सदैव आदर करा, असे भावनिक प्रतिपादन त्यांनी केले. त्यांच्या प्रभावी काव्यसादरीकरणाला विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
कार्यक्रमात इयत्ता दहावी व बारावी बोर्ड परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा तसेच सीईटी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. शिक्षक पात्रता परीक्षेत यश मिळविणाऱ्या शिक्षकांचाही विशेष सन्मान करण्यात आला. आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना 'लोकनेते शिष्यवृत्ती' अंतर्गत रोख शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले. गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले, तसेच लोकनेते जयंतीनिमित्त आयोजित विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमास संस्थेचे संचालक मधुकर मारडकर, दत्तात्रय थिटे, बजरंग डिकोळे, किरण गुंड, लहू निरगिडे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा माजी प्राचार्य चंद्रकांत ढोले, माजी विस्ताराधिकारी शरद उंबरे, प्राचार्य महादेव चोपडे, उपप्राचार्य माधव खरात, पर्यवेक्षक राजेंद्र डोके यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्यवान दाढे यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य माधव खरात यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages