अपूर्ण रस्त्यामुळे तहसील आवारात घसरगुंडी; चिखलामुळे अपघातांचा धोका वाढला - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 9, 2026

अपूर्ण रस्त्यामुळे तहसील आवारात घसरगुंडी; चिखलामुळे अपघातांचा धोका वाढला

 अपूर्ण रस्त्यामुळे तहसील आवारात घसरगुंडी; चिखलामुळे अपघातांचा धोका वाढला





करमाळा (कटूसत्य वृत्त):- करमाळा तहसील आवारातील रस्त्याचे काम गेल्या महिन्याभरा पासून सुरू असून बहुतांश काम अंतिम टप्प्यात आले असले, तरी तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून तहसील कार्यालयापर्यंतचा सुमारे ५०० फूटांचा रस्त्याचा भाग अद्याप अपूर्णच आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या अपूर्ण भागात मोठ्या प्रमाणावर चिखल साचल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असून, या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे उर्वरित काम तातडीने पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी होत आहे.
तहसील कार्यालय, पंचायत समिती, भूमी अभिलेख कार्यालय तसेच इतर प्रशासकीय कार्यालयांकडे जाण्यासाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. दररोज विविध शासकीय कामांसाठी मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी ये-जा करीत असतात. विशेषतः महसूल, जमिनीचे उतारे, नकाशे, दाखले, शासकीय कागदपत्रे, विविध अर्ज आणि पंचायत समितीशी संबंधित कामांसाठी ग्रामीण भागातूनही अनेक नागरिक तहसील कार्यालयात येत असतात. त्यामुळे या रस्त्यावरील अपूर्ण कामाचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह शासकीय कामकाजासाठी येणाऱ्या वृद्ध, महिला आणि दुचाकीस्वारांनाही बसत आहे.
स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तहसील कार्यालयाच्या गेटपासून आतपर्यंतचा उर्वरित रस्ता अद्याप पूर्ण न झाल्याने पावसाचे पाणी साचून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. परिणामी या ठिकाणी वाहन घसरून अपघात होण्याच्या घटना घडत आहेत. आतापर्यंत तीन ते चार नागरिक दुचाकीवरून जाताना चिखलात घसरून पडल्याच्या घटना घडल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली, तरी अशा घटना वारंवार घडू लागल्यास गंभीर अपघात होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
तहसील कार्यालय परिसरात रोज मोठ्या संख्येने वृद्ध नागरिक शासकीय कामासाठी येत असतात. काही जणांना आधारासाठी काठीचा वापर करावा लागतो, तर काही नागरिकांना चालताना विशेष काळजी घ्यावी लागते. अशा परिस्थितीत चिखलमय रस्त्यावरून चालणे हे त्यांच्यासाठी अधिक धोकादायक ठरत आहे. दुचाकीस्वारांनाही वाहन सावधपणे चालवावे लागत असून, रस्त्याच्या अपूर्ण अवस्थेमुळे परिसरात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागरिकांच्या मते, रस्त्याचे काम बहुतांश पूर्णत्वास आले असताना केवळ प्रवेशद्वारापासून तहसील कार्यालयापर्यंतचा महत्त्वाचा भाग रखडल्याने संपूर्ण कामाचा उपयोगच कमी झाला आहे. प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन उर्वरित रस्ता तातडीने पूर्ण करावा, तसेच पावसाळ्यात चिखल आणि घसरण टाळण्यासाठी आवश्यक तात्पुरती उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
अपघाताची शक्यता लक्षात घेता संबंधित विभागाने या कामात विलंब न लावता उर्वरित रस्ता लवकर पूर्ण केल्यास तहसील कार्यालयात येणाऱ्या हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages