नदी ही जीवन, संस्कृती आणि सभ्यतेचा आधार आहे" – डॉ. राजेंद्र सिंह
पुणे (कटूसत्य वृत्त):- “नदी म्हणजे केवळ पाणी वाहणारा कालवा नव्हे, तर ती संस्कृती आणि निसर्ग यांना जोडणारा प्रवाह असून जीवन, संस्कृती आणि सभ्यतेचा आधार आहे. नद्या कोरड्या पडल्या, तर त्यासोबत संस्कृती आणि सभ्यतेचाही ऱ्हास होतो.” असे प्रतिपादन जलतज्ञ ज्येष्ठ जलसंवर्धनतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी केले. पुण्यातील छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) प्रेक्षागृह येथे ‘एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाच्या वतीने आयोजित पुनर्जीवित नदी ‘बद्दह’ या त्यांच्या हिंदी व रिटा रॉड्रिग्स यांनी अनुवादित केलेल्या मराठी आवृत्तीचा प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे जेष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. राजेंद्र शेंडे व जेष्ठ समाजसेवक जयाजी पाईकराव यांच्या हस्ते आणि एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाच्या कार्याध्यक्षा प्रा. स्वाती कराड चाटे व संस्थापक कुलगुरू प्रा. डॉ. गोपालकृष्ण जोशी यांच्या उपस्थितीत या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. माईर्स एमआयटी शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या शुभ आशीर्वादाने हा सोहळा पार पडला. यावेळी संचालक - स्ट्रॅटेजी अँड ऑपरेशन्स राघवेंद्र एम. चाटे, प्रोजेक्ट डायरेक्टर प्रा. प्रभा कासलीवाल, कुलसचिव प्राणेश मुरनाळ यांच्यासह शैक्षणिक, सामाजिक, उद्योग क्षेत्रातील तसेच जलसंवर्धन व पर्यावरण तज्ञ उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. सिंह म्हणाले " पुणे हे संस्कृती, शिक्षण आणि विचारांचे शहर आहे. मात्र, या शहरातून वाहणाऱ्या नद्यांची अवस्था चिंताजनक आहे. नद्यांचे स्वरूप बदलणे हे त्या भागातील संस्कृतीचा ह्यास होण्याचे लक्षण आहे. सध्याच्या काळात नद्यांना पुन्हा जीवित करण्याची गरज आहे आणि जलसंपत्तीचे संवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे."
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. राजेंद्र शेंडे याप्रसंगी बोलताना म्हणाले, "पर्यावरण संरक्षण केवळ धोरणांमधून किंवा आंतरराष्ट्रीय करारांमधून साध्य होणार नाही. हा बदल विद्यापीठे, तरुणाई आणि समाजाच्या सक्रिय सहभागातूनच घडेल. जलसंवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकास हे परस्परांशी जोडलेले विषय असून शिक्षण, संशोधन आणि समाजाभिमुख उपक्रमांचा समन्वय ही काळाची गरज आहे."
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत विद्यापीठाच्या कार्यकारी अध्यक्षा प्रा. स्वाती कराड चाटे यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाच्या शाश्वत विकास, पर्यावरणीय जबाबदारी, जलसंवर्धन आणि सामाजिक सहभाग या मूल्यांवर आधारित विविध उपक्रमांची माहिती दिली. प्रा. स्वाती कराड चाटे म्हणाल्या, “विद्यार्थ्यांना केवळ गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच पर्यावरण-जागरूक आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील नागरिक म्हणून घडविणे हे विद्यापीठाचे ध्येय आहे. पुनर्जीवित नदी ‘बद्दह' हे पुस्तक जलसंवर्धनाच्या विचारांना समाजात नवी दिशा देणारे, लोकसहभागाला प्रेरणा देणारे आणि नव्या पिढीसाठी मार्गदर्शक संदर्भग्रंथ ठरेल." विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. गोपालकृष्ण जोशी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाच्या वतीने डॉ. राजेंद्र सिंह यांच्या पुनर्जीवित नदी ‘बद्दह’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यामागची भूमिका स्पष्ट केली. “जलसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षण हे विषय केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित राहू नयेत, तर विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष कृतीत उतरावेत, या उद्देशाने एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाने या पुस्तकाच्या प्रकाशनाचा पुढाकार घेतला आहे”, असे त्यांनी यावेळी नमूद केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. प्रभा कासलीवाल यांनी केले.

No comments:
Post a Comment