खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याचा टेंभुर्णीत पत्रकारांकडून निषेध - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, June 27, 2026

खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याचा टेंभुर्णीत पत्रकारांकडून निषेध

 खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याचा टेंभुर्णीत पत्रकारांकडून निषेध

टेंभुर्णी प्रेस क्लब व ग्रामीण पत्रकार संघटनांचे निवेदन; कायदेशीर कारवाई व निलंबनाची मागणी



टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांविषयी केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ टेंभुर्णी येथे पत्रकार संघटनांच्या वतीने गुरुवारी निषेध व्यक्त करण्यात आला. टेंभुर्णी प्रेस क्लब तसेच शहर-ग्रामीण पत्रकार महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन संबंधित वक्तव्याबाबत कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
पत्रकार संघटनांच्या निवेदनात नमूद करण्यात आले की, खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांविषयी वापरलेली भाषा आणि कथित धमकीचे स्वरूप हे अत्यंत गंभीर असून, प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर थेट परिणाम करणारे आहे. लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक जीवनात जबाबदारीने आणि संयमाने वागणे अपेक्षित असताना अशा प्रकारचे वक्तव्य लोकशाही मूल्यांना बाधा पोहोचवणारे असल्याचे पत्रकारांनी नमूद केले.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, पत्रकार समाजातील विविध प्रश्न, अन्याय, जनहिताच्या बाबी आणि प्रशासनाशी संबंधित मुद्दे जनतेपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे कार्य करत असतात. अनेकदा प्रतिकूल परिस्थितीत काम करत असतानाही पत्रकार लोकशाही व्यवस्थेचा महत्त्वाचा घटक म्हणून आपली जबाबदारी पार पाडतात. भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या चौकटीत पत्रकार कार्य करत असून, धमक्या किंवा दबाव टाकून पत्रकारितेचे कार्य रोखण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही, अशी भूमिका संघटनांनी स्पष्ट केली.
या निवेदनाद्वारे खासदार संजय दिना पाटील यांच्याविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, संबंधित घटनेची चौकशी करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच त्यांना दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
यासोबतच प्रशासनाने योग्य ती कार्यवाही न केल्यास तालुका व जिल्हास्तरावरील पत्रकारांच्या वतीने लोकशाही मार्गाने व्यापक आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक तसेच जिल्हा माहिती कार्यालय यांना पाठविण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे माढा तालुका अध्यक्ष अनिल जगताप, टेंभुर्णी प्रेस क्लबचे अध्यक्ष सतीश चांदगुडे, शहर-ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय भोसले, सदाशिव पवार, राजेंद्र दडस, गणेश पोळ, संतोष वाघमारे, गणेश चौगुले, हरिश्चंद्र गाडेकर, सतीश काळे, सूरज देशमुख, सचिन होदाडे, एम.एस. मराठी यूट्यूब चॅनलचे नाताजी सावंत, संजीवनी आरबोळे यांच्यासह मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages