करमाळा शहरातील कानाड गल्ली परिसरातील नागरिकांनी अतिक्रमण,
करमाळा (कटूसत्य वृत्त):- करमाळा शहरातील कानाड गल्ली परिसरातील नागरिकांनी अतिक्रमण, अवैध धंदे, अस्वच्छता आणि महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावरून करमाळा नगरपरिषदेकडे निवेदन सादर करत तातडीने कारवाईची मागणी केली आहे. परिसरात वाढत्या बेकायदेशीर प्रकारांमुळे नागरिक भयभीत वातावरणात जीवन जगत असल्याचा गंभीर आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, कानाड गल्ली परिसरातील शासकीय गटारांवर तसेच पाण्याच्या टाकीजवळ अतिक्रमण करण्यात आले असून, त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. परिणामी अपघातांची शक्यता वाढली असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याच परिसरात अवैध मटन व मासे विक्री, मटका व्यवसाय, बेकायदेशीर दारू विक्री तसेच अस्वच्छतेमुळे दुर्गंधी पसरत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असल्याने नागरिकांना पाणी भरण्यास अडचणी निर्माण होत आहेत. दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. तसेच पाण्याच्या टाकीवर कमी नळतोट्या असल्याने नागरिकांमध्ये वारंवार वाद व भांडणे होत असल्याने सर्व बाजूंनी अतिरिक्त नळतोट्या बसविण्याची मागणीही करण्यात आली आहे.
निवेदनात काही व्यक्तींकडून धमकी, दमदाटी, मारहाण तसेच खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिक भीतीच्या छायेत राहत असल्याचे सांगण्यात आले.
महिलांच्या सुरक्षेबाबतही नागरिकांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. परिसरात संशयित व्यक्तींचा वावर वाढल्याने महिलांना त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच परिसरात छेडछाडीच्या घटनाही घडत असल्याचे नागरिकांनी निवेदनात नमूद केले आहे. अलीकडेच पुणे येथे चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून हत्या झाल्याच्या घटनेचा संदर्भ देत, अशा प्रकारच्या घटना येथे घडू नयेत यासाठी प्रशासनाने वेळीच कठोर पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
सदर अतिक्रमण, अवैध मटन विक्री व इतर बेकायदेशीर प्रकारांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे.
या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री, आरोग्यमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, महिला आयोग, करमाळा तहसीलदार तसेच स्थानिक पोलीस प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

No comments:
Post a Comment