२००३ साल असावे. लेन प्रकरण राज्यभर तापत होते. गावागावात जागृतीसाठी सभा, कोपरा बैठक होत होत्या. लोकांमध्ये संताप वाढत होता. त्याचाच एक भाग म्हणून माझे मूळ गाव पेठवडज येथे विवेकी युवकांनी मधुकर महाराज बारुळकर यांचे जाहीर व्याख्यान ठेवले होते. त्या दिवशी मी एका नातेवाईकांना भेटायला नांदेड येथे गेलो होतो. सभा संध्याकाळी ग्रामपंचायत समोर होती. संध्याकाळी मी आवर्जून मधुकर महाराज बारुळकर यांच्या जाहीर सभेस उपस्थिती लावली. त्यांचे ते रोखठोक पण मुद्देसूद बोलणे, टिपेचा आवाज, आकाशाकडे वर हात करून बोलण्याची पद्धत आणि त्यांनी मांडलेले तर्कशुद्ध आणि तर्ककठोर विचार ऐकता क्षणी मनात घर करून बसले. त्यांच्या सोबत, ते ज्या मराठा सेवा संघात काम करतात तिथे आपणही काम करावे अशी भावना हळूहळू होत गेली. महाराजांच्या बोलण्यात प्रचंड आत्मविश्वास होता कारण त्यांचे विचार सुस्पष्ट असे असल्याने तो आत्मविश्वास त्यांच्या बोलण्यात आणि देहबोलीतूनही जाणवायचा. त्यांचा आणि माझा हा पहिला वहिला संपर्क आला ते माझे चुलत बंधू मारुती जाधव यांच्यामुळे.
त्यानंतर महाराज पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रभर फिरत राहिले. अगदी काल परवा जेव्हा त्यांचा करुण अंत झाला तेव्हाही ते मराठा सेवा संघाच्याच कुटुंब मेळाव्यातून गावाकडे परत येत होते. नामदेव - तुकोबाराय वारकरी परिषदेच्या माध्यमातून महाराजांनी अवघा महाराष्ट्र पिंजून काढला. देतो तीक्ष्ण उत्तरे | पुढे व्हावयासी बरे || हा जगद्गुरु तुकोबारायांचा वारसा घेऊन महाराज खेडोपाडी, वाडी, वस्ती तांड्यावर फिरत राहिले. कार्यक्रमाला जाण्यासाठी ना कोणत्या मोठ्या गाडीची गरज ना कसल्या बडेजावाची गरज.अगदी सहजपणे कोणामध्येही मिसळणारा हा जगद्गुरु तुकोबारायांचा अवलिया. लहान असो मोठा असो सर्वांशी मित्रत्वाने, प्रेमाने आणि सदैव हसत खेळत बोलणारे व्यक्तिमत्व म्हणजे मधुकर महाराज बारुळकर. महाराजांचे वाचन प्रचंड होते त्यांचा व्यासंग दांडगा होता. ज्ञानेश्वरी, गाथा, नामदेव महाराजांचा गाथा, एकनाथी भागवत त्याबरोबरच विविध धार्मिक ग्रंथ त्यांनी वाचून काढले होते. त्या ग्रंथांचा वेळोवेळी अभ्यासही ते करत असत. त्यामुळे त्यांच्या बोलण्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास जाणवत असे. *धर्मासारख्या संवेदनशील प्रांतात वावरत असतानाही महाराजांनी तर्कशुद्ध विचारांचे कठोर वार श्रोत्यांवर केले. परंतु कधीही श्रोत्यांच्या भावना दुखावल्या नाहीत. त्याचे कारण म्हणजे त्यांच्या विचारांना जोड होती ती संतांच्या विचारांची.
तसे पाहायला गेले तर महाराजांची कौटुंबिक पार्श्वभूमी ही काही व्यासंगी अशा कुटुंबाची नव्हती. महाराजांचे शिक्षणही तसे जेमतेमच झाले होते. शेती करत करत अक्षरांचे श्रम करणारा हा जगद्गुरु तुकोबारायांचा हाडाचा वारकरी होता. प्रबोधनाच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढत असताना त्यांनी आपल्या लेकरांकडे कधीही दुर्लक्ष होऊ दिले नाही. दोन मुलं व एक मुलगी यांना उच्च शिक्षण दिले. मुलीला शिक्षक तर दोन मुलांना राज्यसेवा आयोगाच्या परीक्षा पास करायला लावून त्यांना उच्च पदस्थ अधिकारीही केले.
खरे तर सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या लोकांबद्दल नेहमी नाक मुरडले जाते. ही मंडळी जीवनात मागे राहतात, करिअरमध्ये मागे राहतात अशा पद्धतीचे दोषारोप त्यांच्यावर जाणीवपूर्वक केले जातात. हेतू एकच की तरुणांनी अशा संघटनांकडे जाऊ नये. परंतु महाराजांसारख्या कित्येक लोकांनी हा समज खोटा ठरवला. स्वतः महाराजांनी आपल्या मुलांना प्रचंड शिकवले. अगदी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या दोन्ही मुलांची पोस्टिंग चांगल्या पदावर झाली होती. थोडक्यात काय तर आयुष्यभर ज्यांनी अक्षरांचा श्रम केला होता त्या मधुकर महाराजांचा श्रम आत्ता कुठे खऱ्या अर्थाने फळाला आला होता. आता त्यांचा जीवनक्रम म्हणजे बैसोनी निवांत सुख भोगू अशाच पद्धतीचा राहिला असता. आठ दहा दिवसांपूर्वीच त्यांच्या मुलाचे लग्नही मोठ्या आनंदात आणि उत्साहात जमले होते. काही दिवसातच ते लग्नही मोठ्या आनंदाने पार पडले असते. महाराजांनी खरंच खूप स्वप्नही पाहिले असतील की आपण आपल्या नातवंडांना खेळवत खेळवत महाराष्ट्रभर जगद्गुरु तुकोबारायांचे शब्द धन वाटत फिरायचे. जगद्गुरु तुकोबारायांचे शब्द बीज पेरत फिरायचे. परंतु काळाला काहीतरी वेगळेच मान्य होते. 31 मार्च रोजी दिवसभर मराठा सेवा संघाच्या कौटुंबिक मेळाव्यामध्ये अत्यंत हसत खेळत आनंदाने उत्साहाने वावरणारे महाराज कार्यक्रम आटपून आपल्या मूळ गावी बारूळ येथे जात असता नांदेड येथील ढवळे कॉर्नर येथे त्यांचा भीषण असा अपघात झाला आणि महाराज जागीच गतप्राण झाले.
माझे चुलत बंधू मारुती जाधव यांनी माझा आणि महाराजांचा पहिला संपर्क घडून आणून दिला होता. त्याच भावाचा मला फोन आला की मधुकर महाराज गेले आणि मला प्रचंड धक्का बसला. परंतु जेव्हा त्यांच्या अपघाताच्या बातम्या आणि व्हिडिओ पाहिले तेव्हा काळजामध्ये चर्र झाले. अगदी शत्रूलाही असे मरण येऊ नये अशा परिस्थितीत महाराज आपणा सर्वांना सोडून गेले.
खरे तर मधुकर महाराजांसारखा वैचारिक कार्यकर्ता, हजारो लोकांना प्रेरणा देणारा वक्ता आणि हजारो भक्तांना वारकरी संप्रदायाचा विचार सांगणारा हाडाचा वारकरी निर्माण होण्यासाठी कित्येक वर्ष जावे लागतात. तशातच नाही भीड भार | तुका म्हणे सान थोर या वृत्तीने बोलणारे मंडळी बरीच कमी झालेली आहेत. जी बोलत होती त्यांनी आपल्या तलवारी म्यान करून ठेवलेल्या आहेत. परंतु काहीही झालं तरी आपला तुकोबारायांचा वारकरी बाणा मात्र कमी करायचा नाही याच विचारांनी झपाटलेले महाराज शेवटपर्यंत आपल्या विचारांचे बॉम्बगोळे श्रोत्यांवर टाकत राहिले. त्यांना पाहिलं की समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण व्हायची. अंगावर पांढरे शुभ्र कपडे. संपूर्ण पेहराव वारकरी. कपाळावर ठसठशीत वारकरी गंध. चेहऱ्यावर सदैव हास्य असणारे महाराज आज महाराष्ट्राला रडवूडन गेले. खूप कष्ट केल्यानंतर एखाद्याच्या समोर भरलेलं ताट यावं आणि त्या ताटावरून अचानक त्याला उठून जाण्याची वेळ यावी अगदी अशीच वेळ महाराजांच्या जीवनामध्ये आली.
त्यांच्यासारखा कीर्तनकार आपल्यातून निघून जाणे हे केवळ त्यांच्या कुटुंबाची, गावाची हानी नसून सबंध मानव जातीची हानी आहे. महाराजांचे कार्य पुढे नेणे हीच खऱ्या अर्थाने महाराजांना श्रद्धांजली ठरेल. आम्हा वारकऱ्यांची पांडुरंगाकडे कायम एक तक्रार असेल, पांडुरंगा मृत्यू कुणालाही चुकला नाही... पण विचारांशी अव्यभिचारी निष्ठा असणाऱ्या मधुकर महाराजांना असे न्यायला नव्हते पाहिजे
हभप डॉ बालाजी महाराज जाधव
गाथा सेवक
मो. ९४२२५२८२९०

No comments:
Post a Comment