मुख्यमंत्री फडणवीसांच्या दौऱ्यात राजेंद्र राऊतांना विधान परिषदेचे गिफ्ट? - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, April 28, 2026

मुख्यमंत्री फडणवीसांच्या दौऱ्यात राजेंद्र राऊतांना विधान परिषदेचे गिफ्ट?

 मुख्यमंत्री फडणवीसांच्या दौऱ्यात राजेंद्र राऊतांना विधान परिषदेचे गिफ्ट?






बार्शी (कटूसत्य वृत्त):- विधान परिषद निवडणुकीचे पडघम राज्यात जोरजोरात वाजत असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज (ता. 28 एप्रिल) भगवंत महोत्सवाच्या निमित्ताने बार्शीच्या दौऱ्यावर येत आहेत.

तब्बल 04 वर्षांनंतर बार्शी येणारे फडणवीस माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यासाठी गोड घोषणा करणार का, याची उत्सुकता बार्शीकरांना लागली आहे.

विधान परिषदेतील नऊ जागा रिक्त झाल्या असून त्यात पाच जागा ह्या भारतीय जनता पक्षाच्या (BJP) वाट्याला येतात. त्या जागेवर सोलापूर जिल्ह्यातील कोणत्या नेत्याची वर्णी लागते? हे पाहावे लागणार आहे. कारण निवृत्त होणाऱ्यांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील रणजितसिंह मोहिते पाटील यांचा समावेश आहे.

विधान परिषदेसाठी सोलापूर जिल्ह्यातून माजी आमदार प्रशांत परिचारक, राजेंद्र राऊत, राम सातपुते आणि शहाजी पवार यांची नावे चर्चेत आहेत. पंढरपूर विधानसभा निवडणुकीत माघार घेताना परिचारक यांना तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी परिचारक हे विधीमंडळात दिसतील, असा शब्द दिला होता. मात्र, अजूनही तो शब्द पूर्ण झालेला नाही. त्यामुळे पहिला क्लेम हा परिचारकांचा असल्याचे मानले जात आहे.

विधानसभेची निवडणूक हरल्यानंतर माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी आपल्या कार्यशैलीत बदल करत बार्शी बाजार समिती, नगरपालिकेपाठोपाठ पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या सर्वच्या सर्व जागांवर विजय मिळविला आहे. त्यामुळे पक्षाला सर्वच निवडणुकांमध्ये यश मिळवून देणारे राजेंद्र राऊत यांचे नावही विधान परिषदेसाठी चर्चेत आहे.

माजी आमदार राऊत यांचे नाव चर्चेत असले तरी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद बार्शी तालुक्याला देण्यात आलेले आहे, त्यामुळे राऊत यांना विधान परिषदेवर संधी मिळणार का, हा खरा प्रश्न आहे. पण, सदस्य नाेंदणीसह निवडणुकांमध्येही भाजपला अव्वल स्थान मिळवून देणाऱ्या राऊत यांना बार्शीच्या दौऱ्यावर येणारे मुख्यमंत्री फडणवीस हे विधान परिषदेचे गिफ्ट देणार का, याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले आहे.

भगवंत महोत्सवाच्या निमित्ताने येणारे देवेंद्र फडणवीस हे बार्शीसाठी नवी कोणती घोषणा करणार, याचीही उत्सुकता बार्शीकरांना आहे. भगवंत मंदिरास 'अ' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची घोषणा या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून होणार का, याबाबतही उत्कंठता आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages