टेंभुर्णी येथे नारीशक्ती वंदन विधेयकाच्या समर्थनार्थ भव्य महिला रॅली; हजारो महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- टेंभुर्णी येथे नारीशक्ती वंदन या ऐतिहासिक विधेयकाच्या समर्थनार्थ भव्य महिला रॅली मोठ्या उत्साहात पार पडली. विविध स्तरांतील महिला, विद्यार्थिनी व महिला पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत महिला सक्षमीकरणाचा ठोस संदेश दिला.
रॅलीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते भारत माता, राजमाता जिजाऊ तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी देशातील महिलांच्या सन्मान व सक्षमीकरणासाठी पारित करण्यात आलेल्या नारीशक्ती वंदन विधेयकाचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान विशेष आकर्षण ठरलेल्या ‘स्वाक्षरी भिंती’वर महिलांनी मोठ्या उत्साहाने स्वाक्षऱ्या करून या ऐतिहासिक निर्णयाला पाठिंबा दर्शविला. तसेच देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत महिलांच्या राजकीय सक्षमीकरणासाठी हा निर्णय महत्त्वाचा असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष सुरजाताई योगेश बोबडे यांनी केंद्र सरकारने महिलांसाठी लागू केलेल्या तेहतीस टक्के आरक्षणाच्या निर्णयाचे जोरदार स्वागत केले. या निर्णयामुळे महिलांना राजकारणात अधिक संधी मिळून त्यांचे नेतृत्व विकसित होईल, तसेच महिला व बालकल्याणाच्या विविध योजना प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचतील, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात नीताताई मगर व जगताप मॅडम यांनीही मनोगत व्यक्त करत या विधेयकाबद्दल समाधान व्यक्त केले. रॅलीची सुरुवात करमाळा रोड येथील सनराईज स्कूलपासून करण्यात आली. रॅलीदरम्यान “धन्यवाद मोदीजी” तसेच महिला सक्षमीकरणाचे संदेश देणारे विविध फलक व घोषणाबाजी हे विशेष आकर्षण ठरले.
या भव्य रॅलीत विविध संघटनांच्या महिला पदाधिकारी, विद्यार्थिनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. माजी जिल्हाध्यक्ष धनश्री खटके, दिपाली बाळासाहेब देशमुख, मंगल खडके, सविता जगताप, सुवर्णा देशमुख, वंदना चौधरी, मनीषा काळे, अनिता आजिनाथ लोंढे, नीता मगर, सुजाता शंकर वगरे, पूजा गांधी, अनिता जाधव, अर्चना सावंत, आशा निमसे, उर्मिला बारबोले, मीनाक्षी पाटणे, राजश्री नेवसे, स्वरालीताई बोबडे आदी महिला पदाधिकारी यावेळी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सहभागींसाठी भोजनदानाचे आयोजन करण्यात आले. हजारोंच्या संख्येने महिला व विद्यार्थिनी सहभागी झाल्याने टेंभुर्णी परिसरात उत्साहाचे व एकात्मतेचे वातावरण निर्माण झाले.


No comments:
Post a Comment