पोखरापूर (कटूसत्य वृत्त) :- मोहोळ तालुक्यातील चिंचोलीकाटी एमआयडीसी परिसरात अवैध मुरूम उत्खनन करून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवण्यात आल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे. या प्रकरणी संबंधित कंपन्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी आमदार राजाभाऊ खरे यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात केली.
आमदार खरे यांनी विधानसभेत हा मुद्दा जोरदारपणे उपस्थित करत सांगितले की, चिंचोलीकाटी परिसरातील काही कंपन्यांकडून बेकायदेशीररित्या मुरूम उपसा करण्यात आला आहे. या उत्खननासाठी शासनाकडे कोणतीही रॉयल्टी जमा करण्यात आलेली नसून, त्यामुळे शासनाच्या तिजोरीला मोठा महसुली फटका बसला आहे.
ते पुढे म्हणाले की, संबंधित कंपन्यांनी तीस ते तीस फूट खोल असे तीन तलाव खोदून त्यातील मुरूम स्वतःच्या वापरासाठी घेतला आहे. या प्रकरणात शासनाकडे रॉयल्टी वसूल केली जाणार का आणि बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल होणार का, असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, या गंभीर आरोपांची दखल घेत महसूल मंत्री बावनकुळे यांनी दोन दिवसांत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आश्वासन दिले आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, आता प्रशासन कोणती कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
.png)
No comments:
Post a Comment