दोन कोटी रुपये खर्चून बेलाटीत उभारणार राम मंदिर
भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण
उत्तर सोलापूर (कटूसत्य वृत्त):- उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी येथे राम मंदिराची उभारणी होणार आहे. जवळपास पंधरा हजार चौरस फूट जागेवर हे मंदिर उभे राहणार आहे. यासाठी जवळपास दोन कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
श्री संत बाळूमामा ट्रस्टच्या वतीने हे मंदिर बांधण्यात येणार आहे. या निर्णयामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
काही दिवसांपूर्वी सोलापूर विजापूर बायपास रोड लगत बेलाटी येथे श्रीराम मंदिराच्या पायाभूत चा शुभारंभ करण्यात आला आहे. बेलाटी येथील प्रसिद्ध असणाऱ्या श्री संत बाळूमामा मंदिराच्या परिसरातच हे राम मंदिर उभे केले जाणार आहे. या मंदिराच्या ट्रस्टचे अध्यक्ष श्रीराम पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार मंदिरासाठी जवळपास दोन कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ट्रस्टच्या वतीने मंदिराच्या उभारणीस सुरुवात केली जाणारा असून उर्वरित कामासाठी वर्गणीच्या माध्यमातून पैसे उभे केले जाणार आहे.
जवळपास १५ हजार चौरस फुटाच्या जागेवर हे मंदिर उभे केले जात आहे. मुख्य गाभारा हा आरसीसी पद्धतीच्या बांधकामात असून समोरील सभागृह हे गोलाकार पत्र्याच्या शेडमध्ये तयार केले जाणार आहे. तर प्रवेशद्वारावर मोठी आरसीसी कमाल उभी केली जाणार आहे. सद्यस्थितीला या बांधकामाच्या पायाचे काम सुरू झाले आहे. शक्य तितक्या लवकर या मंदिराचे काम पूर्ण करण्याचा निर्धार असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.
या उपक्रमासाठी ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अनेकांनी आर्थिक व श्रमदानाच्या माध्यमातून सहभाग नोंदवण्याची तयारी दर्शविली आहे. मंदिर उभारणीसाठी लवकरच भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टच्या वतीने देण्यात आली. गावाच्या विकासात आणि धार्मिक वातावरण वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

No comments:
Post a Comment