प्रभाग ४ च्या मतदारांकडून ‘यावेळी बदल घडवू’चा सूर; राष्ट्रवादी ला चांगला प्रतिसाद
सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ४ मध्ये शिवसेना–राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या उमेदवारांनी वैयक्तिक संपर्क व प्रत्यक्ष दौऱ्यांद्वारे प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. घराघरांत जाऊन, गल्ली-बोळातून फिरत मतदारांशी थेट संवाद साधला जात असून, या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
प्रचारादरम्यान अनेक ठिकाणी मतदार स्वतःहून पुढे येत, “यावेळी नक्कीच बदल घडवू” अशी भावना व्यक्त करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. विकास, पारदर्शक कारभार व सामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेणाऱ्या उमेदवारांमुळे प्रभागात बदलाचा स्पष्ट संकेत मिळू लागल्याचा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.
प्रभाग क्रमांक ४ मधून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार सी. ए. सुशिल बंदपट्टे यांनी नागरिकांशी संवाद साधताना सांगितले की, स्थानिक समस्या, नागरी सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते व मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. “कामाचा माणूस, आपला माणूस” या भूमिकेतून लोकप्रतिनिधित्व करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रचार दौऱ्यावेळी प्रभाग क्रमांक ४ मधील शिवसेना–राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे अधिकृत उमेदवार अ) कविता चंदनशिवे, ब) सी. ए. सुशिल बंदपट्टे, क) सारिकताई फुटाणे व ड) विश्वनाथ बिडवे उपस्थित होते. सर्व उमेदवारांनी एकत्रितपणे मतदारांशी संवाद साधत युतीला पाठिंबा देण्याचे आवाहन केले.
प्रभागात सुरू असलेल्या या वैयक्तिक संपर्क मोहिमेमुळे युतीच्या प्रचाराला बळ मिळाले असून, आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक ४ मध्ये बदल निश्चित असल्याची भावना समर्थकांमध्ये व्यक्त होत आहे.


0 Comments