Hot Posts

6/recent/ticker-posts

श्री सिद्धरामेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक मार्ग व होम मैदानाची आयुक्तांकडून पाहणी

 श्री सिद्धरामेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक मार्ग व होम मैदानाची आयुक्तांकडून पाहणी




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहरात भाविकांच्या श्रद्धेने आणि उत्साहात साजरी होणाऱ्या श्री सिद्धरामेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर आज सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी यात्रेसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या होम मैदान तसेच नंदी ध्वज मिरवणूक मार्गाची सखोल पाहणी केली.यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, राजशेखर हिरेहब्बू, नगर अभियंता सारिका आकूलवर, अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी,मनोज जाधव, सागर करोसेकर उपस्थिती होते.या पाहणीदरम्यान यात्रेदरम्यान भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये तसेच मिरवणूक सुरळीत व सुरक्षित पार पडावी, यासाठी आयुक्तांनी संबंधित विभागांना विविध महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. मिरवणूक मार्गावरील झाडांच्या अडथळा निर्माण करणाऱ्या फांद्या तात्काळ कट करून काढाव्यात, जेणेकरून उंच नंदी ध्वज, मिरवणूकला अडचण येऊ नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या.तसेच मिरवणूक मार्गावरील लटकणाऱ्या केबल वायर, टेलिफोन व विद्युत तारा सुरक्षित पद्धतीने दुरुस्त अथवा हलविण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले. यात्रेदरम्यान रात्रीच्या वेळी प्रकाशयोजना योग्य राहावी यासाठी एलईडी लाईट्स व अतिरिक्त प्रकाश व्यवस्था उभारण्याबाबत तसेच खराब किंवा बंद असलेल्या लाईट्स तात्काळ दुरुस्त करण्याचे आदेश देण्यात आले.
मिरवणूक मार्गावरील खड्डे, रस्त्यांची दुरवस्था व आवश्यक ठिकाणी रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावीत, जेणेकरून भाविक, वाहनचालक व मिरवणूक सहभागी यांना कोणताही धोका निर्माण होणार नाही, असेही आयुक्तांनी सांगितले.
होम मैदान परिसरात यात्रेसाठी होणाऱ्या धार्मिक विधी व कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता, पिण्याचे पाणी, तात्पुरती शौचालये, विद्युत पुरवठा, आरोग्य सुविधा व अग्निशमन यंत्रणेची सज्जता याबाबतही आयुक्तांनी पाहणी करून आवश्यक त्या सुधारणा करण्याचे निर्देश दिले.यात्रेच्या काळात स्वच्छता विभाग, पाणीपुरवठा विभाग, विद्युत विभाग, उद्यान विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, अग्निशमन दल, वाहतूक पोलिस व पोलीस प्रशासन यांनी परस्पर समन्वयाने काम करून यात्रेचे नियोजन यशस्वी करावे, असे निर्देश आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिले.
सोलापूर महानगरपालिका श्री सिद्धरामेश्वर यात्रेसाठी सर्वतोपरी तयारी करत असून, भाविकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
Reactions

Post a Comment

0 Comments