एक खिडकी कक्षात प्रचार परवानग्यांसाठी मोठी गर्दी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक प्रचारासाठी महापालिका प्रशासकीय इमारत येथे "एक खिडकी कक्ष" कार्यान्वित करण्यात आला आहे. आज या ठिकाणी प्रचाराच्या रिक्षांची मोठी रांग लागली होती.
इतर परवान्यांसाठीही मोठी गर्दी झाली होती. परवानगी देण्यात विलंब होत असल्याने कर्मचारी वाढविण्याची मागणी होत आहे..
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक प्रचारासाठी आवश्यक परवानग्या सुलभ, पारदर्शक व वेळेत मिळाव्यात, यासाठी महापालिकेच्या वतीने "एक खिडकी कक्ष" प्रभावीपणे कार्यान्वित करण्यात आला आहे. या कक्षाच्या माध्यमातून उमेदवार व राजकीय पक्षांना प्रचारासंबंधी सर्व परवानग्या एका ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जात आहेत.याशिवाय, खाजगी जागांवर बॅनर व फलक लावण्यासाठीची परवानगी, तात्पुरते प्रचार कार्यालय उभारण्याची परवानगी तसेच प्रचारासाठी वाहन परवानगीदेखील एकाच ठिकाणी देण्यात येत आहे. या एक खिडकी कक्षामध्ये सोलापूर महानगरपालिका, पोलीस विभाग आणि प्रादेशिक परिवहन विभाग संयुक्तपणे कार्यरत आहेत.
दरम्यान, या कक्षामध्ये आज विविध परवानगीसाठी संबंधितांची मोठी गर्दी दिसून आली. खिडक्या कमी आहेत. त्या संख्येत वाढ करावी. परवानगीसाठी अर्ज घेण्यात येतो मात्र पोच पावती देण्यात येत नाही. प्रचार रिक्षा परवानगीसाठी विविध कागदपत्रे मागणी केलेली आहे. तो परवाना देण्यासाठी फार वेळ लागत आहे. रिक्षा लांब थांबवून येत असल्याने अडचणी निर्माण होत आहेत. या ठिकाणी टोकन सिस्टीम सुरू करावी. पाण्याची व बसण्याची सोय करावी अशी मागणी होत आहे. प्रचारासाठी दिवस कमी आहेत. तात्काळ याकडे महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी लक्ष घालून आवश्यक त्या सूचना द्याव्यात अशीही मागणी होत आहे.

0 Comments