Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रचार सभांसाठी १३ मैदानांसह ५८ चौक निश्चित

 प्रचार सभांसाठी १३ मैदानांसह ५८ चौक निश्चित





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक प्रचारासाठी महापालिकेच्या वतीने "एक खिडकी कक्ष" कार्यान्वित करण्यात आला आहे. निवडणूक प्रचारासाठी जाहीर सभा घेण्यासाठी शहरातील एकूण १३ मैदाने, क्रीडांगणे व खुल्या जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

तसेच कॉर्नर सभा (कोपरा सभा) घेण्यासाठी शहरातील विविध भागांतील ५८ चौक व ठिकाणे निश्चित करण्यात आली, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिली.

सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक प्रचारासाठी आवश्यक परवानग्या सुलभ, पारदर्शक व वेळेत मिळाव्यात, यासाठी महापालिकेच्या वतीने "एक खिडकी कक्ष" प्रभावीपणे कार्यान्वित करण्यात आला आहे. या कक्षाच्या माध्यमातून उमेदवार व राजकीय पक्षांना प्रचारासंबंधी सर्व परवानग्या एका ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जात आहेत.याशिवाय, खाजगी जागांवर बॅनर व फलक लावण्यासाठीची परवानगी, तात्पुरते प्रचार कार्यालय उभारण्याची परवानगी तसेच प्रचारासाठी वाहन परवानगीदेखील एकाच ठिकाणी देण्यात येत आहे. त्यामुळे उमेदवारांना विविध विभागांमध्ये स्वतंत्रपणे फेऱ्या मारण्याची गरज भासत नसून, परवानगी प्रक्रियेत वेग व सुलभता आली आहे. या एक खिडकी कक्षामध्ये सोलापूर महानगरपालिका, पोलीस विभाग आणि प्रादेशिक परिवहन विभाग संयुक्तपणे कार्यरत आहेत.

सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी एक खिडकी व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक आचारसंहिता, पारदर्शकता आणि उमेदवार व नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये, याबाबत आवश्यक सूचना दिल्या. या पाहणीप्रसंगी उपायुक्त आशिष लोकरे, सहायक आयुक्त मनीषा मगर, पी. पी. जाधव यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

सोलापूर महानगरपालिका निवडणूक प्रक्रियेत सुयोग्य नियोजन, कायद्याचे पालन आणि सर्वांना समान संधी मिळावी यासाठी कटिबद्ध असून, 'एक खिडकी कक्ष'मुळे प्रचार परवानग्या अधिक सोप्या व पारदर्शक पद्धतीने दिल्या जात असल्याचे आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी यावेळी स्पष्ट केले.
Reactions

Post a Comment

0 Comments