प्रभाग १५ क मधून गाडेकरांचा प्रचार जोरात
राष्ट्रवादीच्या घड्याळाकडून उमेदवारी
सोलापूर (कटूसत्य वृत्त) :– सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १५ क मधील राजकीय वातावरण तापू लागले असून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) कडून घड्याळ या निवडणूक चिन्हावर गाडेकर महेश बजरंग यांनी उमेदवारी दाखल केली आहे. सामाजिक कार्याच्या जोरावर आणि अभ्यासपूर्ण मांडणीमुळे त्यांचा प्रचार वेग घेत असल्याचे चित्र दिसत आहे.
माळकरी कुटुंबातून आलेले, निर्व्यसनी व तत्वनिष्ठ सामाजिक कार्यकर्ते म्हणून गाडेकर महेश बजरंग यांची ओळख आहे. सत्तेसाठी नव्हे, तर समाजहितासाठी आणि लोकशाही अधिक भक्कम करण्यासाठी निवडणूक लढवत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. ‘सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता’ या प्रवृत्तीला छेद देण्यासाठी सामान्य नागरिकांचा सक्षम पर्याय म्हणून ते निवडणूक रिंगणात उतरल्याचे त्यांच्या समर्थकांकडून नमूद करण्यात येत आहे.
प्रभाग १५ मधील विविध सार्वजनिक प्रश्नांवर त्यांनी यापूर्वी सक्रिय भूमिका घेतली आहे. सिद्धेश्वर यात्रेतील धूळप्रदूषण, स्वच्छता व आपत्कालीन रस्त्याच्या प्रश्नावर त्यांनी न्यायालयीन लढा दिला होता. तसेच पार्क चौकाचे नामकरण महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक व भैय्या चौकाचे नामकरण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक करून तेथे स्वच्छता व सुशोभीकरणाची कामे झाल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
कोरोना महामारीच्या काळात बाधित रुग्णांची माहिती जाहीर करण्यासंदर्भात त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याची जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दखल घेतल्याचा उल्लेखही प्रचारादरम्यान करण्यात येत आहे. कायद्याचा अभ्यास, सामाजिक प्रश्नांची जाण आणि कष्टकरी वर्गाबद्दलची संवेदनशीलता ही त्यांची वैशिष्ट्ये असल्याचे मत समर्थक व्यक्त करत आहेत.
निवडणूक प्रचारात मतदारांना जात, धर्म व पंथ न पाहता सामाजिक कार्याचा विचार करून मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. जागरूक व सुज्ञ मतदारांनी योग्य उमेदवाराची निवड करावी, असा संदेश प्रचारातून देण्यात येत आहे.
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान गुरुवार, दि. १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत होणार आहे. प्रभाग १५ क मधील ही लढत लक्षवेधी ठरण्याची शक्यता असून, मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

0 Comments