महाविकास आघाडीचा ‘शहर विकास जाहीरनामा’ प्रकाशन
कामगार, कष्टकरी व सामान्य नागरिकांच्या हस्ते जाहीरनामा; “शहर प्रथम” भूमिकेचा निर्धार
सोलापूर (कटूसत्य वृत्त) : सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने पुढील पाच वर्षांसाठीचा दूरदृष्टीपूर्ण ‘शहर विकास जाहीरनामा – २०२६’ अधिकृतरित्या जाहीर केला. हा प्रकाशन सोहळा हॉटेल सूर्या, मुरारजी पेठ, सोलापूर येथे मोठ्या उत्साहात आणि जनसहभागातून पार पडला.
या जाहीरनाम्याच्या माध्यमातून सोलापूर शहराच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि पायाभूत विकासाचा सविस्तर आराखडा नागरिकांसमोर मांडण्यात आला आहे. “चला एकत्र लढूया सोलापूरच्या नवनिर्मितीसाठी, परिवर्तन घडवूया” आणि “जनसेवेच्या माध्यमातून नवी दिशा – सोलापूर शहराची सर्वांगीण प्रगती” हा जाहीरनाम्याचा मुख्य संदेश आहे.
कष्टकरी वर्गाच्या हस्ते जाहीरनामा प्रकाशन
या जाहीरनाम्याचे वैशिष्ट्य म्हणजे, शहराच्या उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या बिडी कामगार, यंत्रमाग कामगार, बांधकाम व बिगारी कामगार, घरकाम करणाऱ्या महिला, रिक्षाचालक आणि कष्टकरी बांधवांच्या हस्ते जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. यामध्ये बिडी कामगार नागमणी गरदास, नीलावती कोटा, घरकाम करणाऱ्या निर्मला माढेकर, यंत्रमाग कामगार दुबया श्रीराम, परमेश्वर बंडा, बांधकाम कामगार भारत तल्लारे, श्रीनिवास म्हेत्रे, नागनाथ शावणे, सुभाष म्हेत्रे तसेच रिक्षाचालक शिवाजी साळुंखे यांचा सहभाग होता.
या प्रकाशन सोहळ्यास खासदार प्रणिती शिंदे, कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार कॉ. नरसय्या आडम, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, काँग्रेस शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) शहराध्यक्ष महेश गादेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख अजय दासरी, कम्युनिस्ट पक्षाचे युसुफ शेख मेजर, काँग्रेस प्रवक्ते अशोक निंबर्गी, प्रताप चव्हाण, दत्ता गणेशकर यांच्यासह महाविकास आघाडीतील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“न्याय, विकास आणि समृद्धी” ही त्रिसूत्री
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यावेळी स्पष्ट केले की, हा जाहीरनामा न्याय, विकास आणि समृद्धी या त्रिसूत्रीवर आधारित असून, सोलापूरची बहुभाषिक, बहुसांस्कृतिक आणि धर्मनिरपेक्ष ओळख जपत ‘शहर प्रथम’ या भूमिकेतून तयार करण्यात आला आहे.
जाहीरनाम्यातील ठळक विकासदृष्टी
जाहीरनाम्यात एक दिवसाआड शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापनाचे सुसूत्रीकरण, प्रदूषणमुक्त व हरित सोलापूरसाठी ठोस उपाय, खड्डेमुक्त व टिकाऊ रस्ते, उद्याने व हिरव्या जागांचे संवर्धन, प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आधुनिकीकरण आणि सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा यांना प्राधान्य देण्यात आले आहे.
याचबरोबर सक्षम SMT परिवहन व्यवस्था उभारून कामगार, विद्यार्थी, महिला, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी सुलभ आणि परवडणारी बससेवा देण्याचा संकल्प जाहीर करण्यात आला आहे.
महिलांसाठी ऐतिहासिक निर्णय
महिलांना केंद्रस्थानी ठेवत शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी शिक्षण, नोकरी व दैनंदिन प्रवासाकरिता SMT बस प्रवास पूर्णतः मोफत करण्याची महत्त्वाकांक्षी घोषणा करण्यात आली. महिला सुरक्षा, आरोग्य व सक्षमीकरणासाठी विशेष योजना राबवण्यावर भर देण्यात आला आहे.
शिक्षण, आरोग्य आणि रोजगारावर भर
महापालिकेच्या शाळा अद्ययावत करणे, मराठी शाळांसाठी विशेष निधी, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची उभारणी, ड्रेनेज व जलवाहिन्यांचे विस्तारीकरण, पार्किंग व्यवस्था, सार्वजनिक स्वच्छतागृहे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, आयटी पार्कद्वारे रोजगारनिर्मिती अशा दूरगामी योजनांचा जाहीरनाम्यात समावेश आहे.
पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचा निर्धार
डिजिटल व आधुनिक प्रशासन प्रणालीद्वारे पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त आणि गतिमान स्मार्ट प्रशासन देण्याचा निर्धार महाविकास आघाडीने व्यक्त केला आहे.
येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांना मोठ्या बहुमताने विजयी करण्याचे आवाहन उपस्थित सर्व नेत्यांनी सोलापूरकर मतदारांना केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल अँड केशव इंगळे आणि तिरुपती परकीपंडला यांनी सर्व पत्रकार बांधवांचे आभार मानले.

0 Comments