दिलेला शब्द पाळण्याचा प्रयत्न करू : संतोष पवार
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शहरातील नागरिक विविध मूलभूत प्रश्नांनी त्रस्त असून प्रशासनावर कोणाचेही प्रभावी नियंत्रण नसल्याची परिस्थिती सध्या दिसून येत आहे. रस्ते, वीज, पाणी आणि आरोग्य या आवश्यक सुविधांचा लाभ आजपर्यंत सत्ताधाऱ्यांकडून नागरिकांना पुरेशा प्रमाणात मिळालेला नाही. त्यामुळे यंदाच्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून विकासाच्या मुद्यावरच निवडणूक लढवली जात असून दिलेला शब्द पाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी दिली.
गेल्या दहा वर्षांपासून शहरातील जनता अनेक मूलभूत समस्यांना सामोरे जात आहे. नागरिकांना नियमित पाणीपुरवठा होत नाही. शहरातील बससेवा अखेरच्या टप्प्यावर पोहोचली असून सामान्य नागरिकांना कमी खर्चात शहरात प्रवास करणे कठीण झाले आहे. हद्दवाढ भागात चांगले रस्ते नाहीत, तर शहरातील मुख्य रस्त्यांचीही अवस्था खड्डेमय झाली आहे. पालिकेची आरोग्य यंत्रणा सक्षम नसून अनेक भागांत रस्त्यांवर अंधाराचे साम्राज्य असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पाण्यासाठी काही भागांत नागरिकांना वणवण भटकावे लागत असल्याचे चित्र आहे. या सर्व मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस ही निवडणूक ताकदीने लढवत असल्याचे पवार यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या धर्तीवर शहराचा सर्वांगीण विकास साधण्याची भूमिका पक्षाने घेतली असून शहराला नवसंजीवनी देण्यासाठी पालिकेची सार्वत्रिक निवडणूक लढवण्यात येत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विकास हा केंद्रबिंदू असून सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या महापालिकांच्या धर्तीवर येथेही विकास साधण्याचा संकल्प आहे. पक्षाचे उमेदवार उच्चशिक्षित, दूरदृष्टी ठेवून काम करणारे असून विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक लढवली जात असल्याचे संतोष पवार यांनी सांगितले.
0 Comments