विकासाची हमी देत मतदारांच्या दारात जात आहोत : महेश गादेकर
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शहराला अनेक मूलभूत प्रश्नांनी वेढले असून त्यातून नागरिकांची सुटका करण्याकडे सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष महेश गादेकर यांनी केला आहे. पाणी, रस्ते, पथदिवे आदी आवश्यक सुविधांच्या प्रश्नांनी शहरातील प्रत्येक नागरिक त्रस्त असून या समस्यांमधून नागरिकांची मुक्तता करण्याचा शब्द देण्यासाठी आम्ही मतदारांसमोर जात असल्याचे त्यांनी सांगितले.
पाणीप्रश्नामुळे नागरिकांचे विशेषतः महिलांचे हाल होत असून रात्री-अपरात्री पाणी येत असल्याने त्यांची झोप उडत आहे. जुनी आणि अनुभवी असतानाही महापालिका सक्षम ठरत नसल्याचे चित्र आहे. गेल्या दहा वर्षांत शहरातील परिवहन सेवा मोडकळीस आली असून रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. पालिकेची आरोग्य यंत्रणाही कुचकामी ठरली असून कोणतीही यंत्रणा ताकदीने काम करत नसल्याचा आरोप गादेकर यांनी केला.
गटारी तुंबणे, अस्वच्छता, नियोजनाअभावी रखडलेली कामे असे शेकडो प्रश्न असून योग्य नियोजन केल्यास ते सहज सुटू शकतात. मात्र हे प्रश्न सोडवण्याची तसदी सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधी घेत नसल्याची टीका त्यांनी केली. तसेच प्रशासनातील अनेक घटकांना काम न करता वेतन हवे असल्याची स्थिती असल्याने पालिकेची कार्यक्षमता कमी झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
या पार्श्वभूमीवर विकासाची ठोस हमी देत आणि प्रश्न सोडवण्याचा शब्द पाळण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष मतदारांच्या दारात जात असल्याचे गादेकर यांनी सांगितले. दूरदृष्टी ठेवून काम करण्याच्या भूमिकेतूनच मतदारांपर्यंत पोहोचत असून यंदा परिवर्तनासाठी मतदारांना साकडे घालण्यात येत आहे.
विकास कोण करू शकतो, विकासासाठी मतदान करून बदल घडवा, अशी साद मतदारांना घालण्यात येणार असून प्रश्न सोडवण्याच्या ठाम भूमिकेतून ही निवडणूक लढवली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

0 Comments