Hot Posts

6/recent/ticker-posts

पंढरपुरातील पालकमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर; शिवसेना नेत्यांवर दबाव तंत्राचा वापर; चर्चेला उधान

 पंढरपुरातील पालकमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर; शिवसेना नेत्यांवर दबाव तंत्राचा वापर; चर्चेला उधान


शिवसेनेचे संपर्कप्रमुख महेश साठे,माजी सरपंच संजय साठे यांना पोलिसांनी बजावली नोटीस

पंढरपूर (कटूसत्य वृत्त ):- 

सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर पंढरपूर पोलिसांनी शिवसेनेचे लोकसभा संपर्कप्रमुख महेश साठे, टाकळीचे माजी सरपंच व सरपंच परिषदेचे सदस्य संजय साठे यांना आचारसंहिता भंगाची नोटीस बजावल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून सत्ताधारी भाजपाकडून शिवसेना नेत्यांवर दबाव तंत्राचा वापर केला जात असल्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे.

पंढरपुरात नगरपालिका निवडणुक निकालानंतर विठ्ठल परिवार फोडण्याच्या उद्देशाने ऐनवेळी भाजपाकडून काळे आणि पाटील गटाला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नुकताच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रांतिक सदस्य कल्याणराव काळे, गणेश पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपात जाहीर प्रवेश केला.
यावेळी पालकमंत्र्यांनी काळे आणि पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास देत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आमदारांना सूचक इशारा दिला होता.
त्याची चर्चा दिवसभर सुरू असतानाच पालकमंत्र्यांच्या पंढरपूर दौऱ्यानंतर दुसऱ्याच दिवशी पोलीस प्रशासनाने शिवसेनेचे संपर्कप्रमुख महेश साठे व टाकळीचे माजी सरपंच संजय साठे यांना आचारसंहिता भंगाची नोटीस बजावल्याने सत्ताधाऱ्यांबाबत वेगळी चर्चा सुरू झाली आहे.

सोलापूर जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला जनतेने कौल दिल्याने निम्म्याहून अधिक नगरपालिकांवर शिवसेनेचा नगराध्यक्ष विराजमान झाल्यानंतर शिवसेनेकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना पंढरपुरात काही ठिकाणी स्थानिक पातळीवर आघाडी करत भाजपा उमेदवारा विरोधात निवडणूक रिंगणात उतरल्याने याचा फटका भाजपा उमेदवाराला बसतो की काय? अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments