भाजपातील ‘प्रवेश राजकारण’ अंगलट येणार?
जुन्या कार्यकर्त्यांच्या नाराजीमुळे नव्याने दाखल माजी नगरसेवकांची कोंडी
भाजपाने अलीकडच्या काळात राबवलेल्या ‘प्रवेश राजकारणा’चा फटका पक्षालाच बसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सोलापूरतील माजी नगरसेवकांना भाजपात प्रवेश दिल्यानंतर पक्षातील जुने, निष्ठावंत आणि वर्षानुवर्षे काम करणारे कार्यकर्ते तीव्र नाराज झाले असून, ही नाराजी आता उघडपणे समोर येऊ लागली आहे. येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा अंतर्गत असंतोष भाजपसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भाजपाने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमधून आणि काॅग्रेस व शिवसेनेचे अनेक माजी नगरसेवकांना पक्षात घेतले. मात्र, या निर्णयामुळे स्थानिक पातळीवर भाजपासाठी झटणाऱ्या जुन्या पदाधिकाऱ्यांना डावलले जात असल्याची भावना बळावली आहे. अनेक प्रभागांत नव्याने आलेल्या नेत्यांना थेट उमेदवारी मिळेल, अशी चर्चा सुरू झाल्याने जुन्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढली होती.
ही नाराजी इतकी तीव्र होती की तिची दखल थेट पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहोचल्याची माहिती आहे. “निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले तर त्याचे गंभीर राजकीय परिणाम होतील,” असा इशारा स्थानिक पातळीवरून दिला गेल्यानंतर भाजप नेतृत्वाला परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबईतील भाजप पक्ष कार्यालयाकडून जुन्या आणि पक्षाशी दीर्घकाळ एकनिष्ठ असलेल्या पदाधिकाऱ्यांनाच येत्या मनपा निवडणुकीत प्राधान्याने उमेदवारी देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. या निर्णयामुळे उत्साहाच्या भरात भाजपात प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकांच्या अपेक्षांना मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
एका बाजूला भाजप संघटनात्मक ताकद टिकवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी पावले उचलत आहे, तर दुसऱ्या बाजूला नव्याने पक्षात आलेल्या नेत्यांची राजकीय गणिते कोलमडण्याची चिन्हे स्पष्ट होत आहेत. “प्रवेश दिला म्हणजे थेट उमेदवारीच मिळेल, ही समजूत आता चुकीची ठरत आहे,” अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
एकंदर पाहता, येणारी महापालिका निवडणूक भाजपासाठी केवळ विरोधी पक्षांशी लढण्यापुरती मर्यादित राहणार नाही, तर पक्षातील अंतर्गत समतोल, निष्ठावंत कार्यकर्त्यांचा विश्वास आणि नव्याने आलेल्या नेत्यांच्या अपेक्षा यांचा तोल सांभाळण्याचीही मोठी कसोटी ठरणार आहे. ‘प्रवेश राजकारण’ भाजपासाठी फायदेशीर ठरेल की अंगलट येईल, याचे उत्तर येत्या काळात स्पष्ट होणार आहे.
0 Comments