निवडणूक आयोगाचा घोळ, शेतकऱ्यांचा असंतोष मुद्दे ठरणार वादळी
आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात
पहिल्याच दिवशी ४ मोर्चे, २ आत्मदहनाचे इशारे, १५ धरणे आणि ९ उपोषण
नागपूर (कटूसत्य वृत्त):- विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवापासून नागपुरात सुरू होणार आहे. शेतकऱ्यांचा असंतोष, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा दबाव या पार्श्वभूमीवर फक्त एक आठवड्याच्या कालावधीत होत असलेले हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.
लोकशाही मार्गाने होणारी आंदोलने हे नागपुरात होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे वेगळेपण आहे. त्यामुळे राज्यभरातील संघटना हिवाळी अधिवेशनात आपल्या मागण्या सरकारपुढे मांडण्यासाठी तयारी करत असतात.
अधिवेशनाच्या संपूर्ण कालावधीत नागपुरात होणाऱ्या आंदोलनांसाठी राज्यभरातून लोक येत असतात. त्यामुळे अधिवेशन काळात या शहराचे वेगळे अर्थकारणही आंदोलनांवर चालत असते. त्यामुळे अधिवेशनाला सुरुवात होताच पहिल्याच दिवशी सोमवारी ४ मोर्चे, २ आत्मदहनाचे इशारे, १५ धरणे आणि ९ उपोषण आंदोलने होणार आहेत.
यंदाच्या विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाला ८ डिसेंबर पासून सुरूवात होणार आहे. त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच शहर मोर्चेकरी, आंदोलकांच्या गर्दीने गजबजणार आहे. यावर्षी कष्टकरी, श्रमिकांच्या संघटनांनी हिवाळी अधिवेशनात होणाऱ्या आंदोलनांसाठी पोलीस आयुक्तालयाकडे परवानगी मागितली आहे. राजकीय पक्षांकडून तीन मोर्चे विधिमंडळ अधिवेशनावर धडकणार आहेत. तर एका पक्षाने साखळी उपोषणाची परवानगी पोलिसांकडे मागितली आहे.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शहरात पहिल्याच दिवशी ४ मोर्चे, २ आत्मदहनाचे इशारे, १५ धरणे आणि ९ उपोषणे सुरू होणार आहेत. शहरात धडकणाऱ्या ४ मोर्चांनी अधिवेशनातल्या आंदोलनांना सुरूवात होणार आहे. त्यामुळे यंदाचे अधिवेशन आठच दिवसांचे असले तरी ते नेहमी प्रमाणे वादळी ठरणार हे निश्चित आहे. संपूर्ण आठ दिवसांत शहरातमध्ये हिवाळी अधिवेशन काळात विधिमंडळावर ३२ मोर्चे धडकतील. या खेरीज अधिवेशन काळात २० धरणे आंदोलने होतील. सोबतच १७ डिसेंबर पर्यंत एक आठवडा चालणाऱ्या अधिवेशन काळात १६ उपोषण आंदोलने होतील. एनवेळी यात राजकीय पक्षांकडून होणारी आंदोलने वाढतील, अशी शक्यता आहे.
पहिल्या दिवशी पवित्र पोर्ट अभियोग्यता प्रक्रिया जलदगतीने पार पाडावी या मागणीसाठी युवा शैक्षणिक सामाजिक न्याय संघटना, विनाअनुदानीत दिव्यांग शाळांना १०० टक्के अनुदान द्या, या मागणीसाठी बीड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास मंच, दिंडोरा प्रकल्प ग्रस्तांना २४० कोटींचे पॅकेज द्या या मागणीसाठी दिंडोरा बॅरेज प्रकल्पग्रस्त आंदोलन समिती तर संजय गांधी निराधार योजनेचा लाभ ५ हजारापर्यंत वाढवा या मागणीसाठी विदर्भ विकलांग समिती अधिवेशनावर मोर्चा काढणार आहे.
तर महाराष्ट्र परिट धोबी मंडळ, पदवीधर अंशकालीन शासकीय कर्मचारी जुनी पेंशन हक्क समिती (बडनेरा), महाराष्ट्र मातंग एकीकरण समिती, बहुजन एम्प्लॉय फेडरेशन, खासगी शाळा शिक्षक संघ, इंडियन अन एम्प्लॉईड इंजिनिअर्स असोसिएशन, अखिल भारतीय अनुसुचित तथा परिगणित जाती सेवक समाज समिती, राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चा, महामायनॉरिटी एनजीओ फोरम, महाराष्ट्र राज्य घरकूल कंत्राटी कर्मचारी संघटना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खोब्रागडे), भरतकुमार दामोदरराव सोळंके, विजय प्रेमदास गजभिये, अखिल मांजराईनगर नागरिक कृती समिती धरणे आंदोलन करणार आहे.
दोघांकडून आत्महदहनाचा इशारा
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गडचिरोली येथील देवेंद्र ब्राह्मणवाडे यांनी खोटा ठराव लिहिणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल न झाल्यास आत्महदहनाचा इशारा दिला आहे. त्यांच्यासह राजेंद्र कुमार रामअवतार मिश्रा यांनी भुमाफिया विरोधात आत्मदहनाचा इशारा दिला आहे. बहुतांश आंदोलने ही शांततेच्या मार्गाने व्हावीत, यासाठी पोलिसांनी यशवंत स्टेडियम मोर्चा पॉईंटवर देखील चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीत राज्य निवडणूक आयोगाने घातलेला घोळ, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांच्याशी संबंधित मुंढव्यातील बेकायदा जमीन खरेदी, मंत्री संजय शिरसाट यांच्यावरील सिडको जमीन घोटाळ्याचा कथित आरोप, साताऱ्यातील डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात भाजपच्या नेत्यांवर होत असलेले आरोप विरोधक लावून धरण्याची शक्यता आहे.
शेतकरी प्रश्न केंद्रस्थानी राहण्याची शक्यता
याशिवाय अधिवेशनात शेतकरी प्रश्न पुन्हा एकदा केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहेत. कापूस आणि सोयाबीनला मिळणारा अल्प भाव, बाजारात करण्यात आलेल्या कृत्रिम दर कपातीचे आरोप, अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळण्यास झालेला विलंब या मुद्द्यांवरून विरोधक सरकारला जाब विचारतील.
महायुती सरकारची वर्षपूर्ती झाली. वर्षभरात केलेल्या कामांचा, घेतलेल्या निर्णयांचा लेखाजोखा घेऊन सरकार सभागृहात विरोधकांवर वरचढ होण्याची शक्यता आहे. सध्या दोन्ही सभागृहांत विरोधी पक्षनेता नाही. यामुळे दुखावलेले विरोधक ताकदीने एकत्र आले आहेत.
निवडणुकांची छाप अधिवेशनावर
राज्यात महापालिकांसह जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लवकरच होण्याची शक्यता असल्याने या निवडणुकांची छाप अधिवेशनावर राहील. प्रत्येक राजकीय पक्ष आपली भूमिका मजबूत करण्याच्या प्रयत्नात असून, सभागृहातील प्रत्येक मुद्द्यावरून राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा सभागृहात तापण्याची शक्यता आहे.
या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज सरकारने आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकल्याचे स्पष्टीकरण देताना नेते भास्कर जाधव यांनी आपली भूमिका मांडली.

0 Comments