संकर्षण व्हाया स्पृहा - गप्पा, गोष्टी आणि कवितांचा अनोखा संगम
सोलापूर / (कटूसत्य वृत):-
'प्रिसिजन गप्पा २०२५' या उपक्रमाच्या पहिल्या दिवशी 'संकर्षण व्हाया स्पृहा...!' या बहारदार कार्यक्रमाने रंगतदार प्रारंभ झाला. सोलापूरच्या रंगभवन सभागृहात सादर झालेल्या या कार्यक्रमात अभिनेता संकर्षण कऱ्हाडे आणि कवयित्री-अभिनेत्री स्पृहा जोशी यांच्या प्रभावी सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध झाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रिसिजनचे चेअरमन यतीन शहा, प्रिसिजन फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा आणि करण शहा यांच्या हस्ते कलाकारांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला सोलापूर महापालिकेचे आयुक्त सचिन ओम्बासे हे सहपरिवार उपस्थित होते. 'वडील, आई, लहानपण आणि भाषेची गोडी' या विषयांवर आधारित 'कविता, गप्पा, गाणी आणि गोष्टी' यांच्या माध्यमातून
दोघांनी जीवनातील कोमल भावविश्व रंगवले.
भावकविता, बालस्मृती आणि भाषेचे माधुर्य यांचा मिलाफ या कार्यक्रमात अनुभवायला मिळाला. विशेष म्हणजे, स्पृहा जोशी यांनी लहान मुलीच्या आवाजात सादर केलेले 'सुंदर हा चॉकलेटचा बंगला' हे गाणे प्रेक्षकांच्या मनाला भिडले. संकर्षण कऱ्हाडे यांच्या विनोदी व भावस्पर्शी शैलीने सभागृहात हास्य आणि भावनांचे रंग एकत्र खुलले. सुरुवातीला गेल्या १७ वर्षांपासून रंगभवन सभागृहाची स्वच्छता कार्यक्रमापूर्वी आयोजकांकडून केली जाते, याविषयीची लघुफिल्म दाखवण्यात आली. यावेळी सोलापूरकरांना आवाहन करण्यात आले की - 'नुसता कार्यक्रम नव्हे, स्वच्छ कार्यक्रम व्हावा, ही आपली संस्कृती व्हावी यासाठी सर्वांनी जबाबदारी घ्यावी.' प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सभागृहच नव्हे तर सभागृहाच्या बाहेरही रसिकांची प्रचंड गर्दी जमलेली होती. भाषेची गोडी, भावनांचा ओलावा आणि सामाजिक संदेश यांचा अनोखा संगम या कार्यक्रमातून दिसून आला.

0 Comments