वंचित बहुजन आघाडी राबवणार अकोला पॅटर्न
सोलापूर (कटूसत्य वृत्त):– आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. शहरातील बदलती राजकीय स्थिती, संघटनात्मक बळकटी आणि निवडणूक धोरणावर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
या बैठकीत सर्वांचे लक्ष वेधून घेतलेला मुद्दा म्हणजे सोलापुरात “अकोला पॅटर्न” राबवण्याचा एकमताने मंजूर झालेला ठराव. सध्या या पॅटर्नबाबत शहरात मोठी चर्चा सुरु असून, या निर्णयामुळे आगामी महापालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची रणनीती अधिक स्पष्ट आणि आक्रमक होणार आहे, असे बैठकीत जाणवले.
बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अध्यक्ष प्रशांत गोणेवार, महिला अध्यक्ष पल्लवी ताई सुरवसे, युवा अध्यक्ष महेश जाधव, महासचिव विनोद इंगळे व संजय हरिजन, युवा महासचिव नरेंद्र शिंदे, लोकसभा उमेदवार अतिश बनसोडे, उत्तर विधानसभा उमेदवार विक्रांत गायकवाड, मध्य विधानसभा उमेदवार श्रीनिवास संगेपाग, शहर संघटक गौतम थापटे, युवक नेते शाहिद शेख व गोटु शिंदे, ज्येष्ठ नेते शिवाजी अप्पा बनसोडे व रवि थोरात तसेच उपाध्यक्ष रोहित लालसरे, विजयानंद उघडे, अमर डुरके, प्रदीप कांबळे, डॅनी सिल्वे व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
बैठकीत बूथस्तरावर संघटनात्मक रचना मजबूत करणे, वंचित घटकांचे तातडीचे प्रश्न, पक्षाची जनसंपर्क मोहीम आणि निवडणूक व्यवस्थापन या महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा झाली.
यावेळी बोलताना नेते अतिश बनसोडे म्हणाले,
“ओबीसी, दलित आणि अल्पसंख्यांक समाजाचा विरोध प्रस्थापित शक्तींविरोधात तीव्र आहे. त्यांना सत्तेच्या प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी सोलापुरात अकोला पॅटर्न काटेकोरपणे राबवणार आहोत.”
बैठकीतून हे स्पष्ट झाले की वंचित बहुजन आघाडी सोलापुरात अधिक सुसंघटित, रणनीतीपूर्ण आणि आक्रमक पद्धतीने महापालिका निवडणूक लढवण्यास सज्ज आहे. या घडामोडींमुळे सोलापुरातील राजकारणाला नवी दिशा मिळण्याची चिन्हे दिसत असून, आगामी निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी भक्कम पर्याय म्हणून उदयास येत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.


0 Comments