Hot Posts

6/recent/ticker-posts

माजी महापौर अ‍ॅड. बेरिया यांच्या जनसेवेच्या सुवर्णपर्वाचा रविवारी गौरव

 माजी महापौर अ‍ॅड. बेरिया यांच्या जनसेवेच्या सुवर्णपर्वाचा रविवारी गौरव




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहरातील सामाजिक, राजकीय, कामगार, शैक्षणिक, सांस्कृतिक, आणि सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेले माजी महापौर अ‍ॅड. यू. एन. बेरिया यांच्या जनसेवेला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्यांचा रविवार, 16 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 3.30 वाजता गांधी नगर येथील द हेरिटेज लॉन येथे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा, ज्येष्ठ नेते पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली भव्य सत्कार व गौरवांक प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती माजी महापौर अ‍ॅड. यू.एन. बेरिया सत्कार समारंभ व गौरवांक प्रकाशन सोहळा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अ‍ॅड. बेरिया यांचा सेवाभाव व न्यायनिष्ठ कार्याचा मागोवा घेण्यासाठी विशेषरित्या प्रसिद्ध केलेल्या गौरवग्रंथाचे या कार्यक्रमात प्रकाशन करण्यात येणार आहे.
या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांची उपस्थिती राहणार आहे.
या सोहळ्याला सोलापूरच्या खासदार प्रणिताताई शिंदे, माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर, करमाळ्याचे आमदार नारायण आबा पाटील, मोहोळचे आमदार राजाभाऊ खरे, पंढरपूरचे आमदार अभिजित आबा पाटील उपस्थित राहणार आहेत.
अ‍ॅड. बेरिया यांनी गेल्या पाच दशकांत आपल्या कार्यकाळात समाजातील सर्व घटकांपर्यंत विकास पोहोचवण्याचा प्रयत्न केला. महापौर म्हणून कार्यरत असताना शहराच्या पायाभूत सोयी-सुविधा उभारण्यास मोठा हातभार लावला आहे. सहकार आणि कामगार क्षेत्राशी असलेली त्यांची बांधिलकी कायम राहिली आहे. कामगारांच्या प्रश्नांसाठी कायदेशीर लढाई लढत असताना त्यांनी अनेकांना न्याय मिळवून दिला. शैक्षणिक क्षेत्रातील बांधिलकीमुळे उपेक्षित घटकांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यात त्यांनी आघाडी घेतली. त्यांच्या कार्याचा हा सुवर्ण महोत्सवी प्रवास आजही दिशादर्शक ठरतो.
या सर्व क्षेत्रातील त्यांच्या मोलाच्या योगदानाची नोंद ठेवत गौरवग्रंथ तयार करण्यात आला असून तो या कार्यक्रमात प्रकाशित केला जाणार आहे. अ‍ॅड. बेरिया यांच्या व्यक्तिमत्त्वाचा व कार्याचा आलेख, सहकार्‍यांच्या आठवणी, त्यांच्या कार्यपद्धतीतील वैशिष्ट्ये तसेच सामाजिक सेवेतून त्यांनी मिळवलेले यश याचा समावेश या गौरवग्रंथात करण्यात आला आहे. त्यांच्या सेवाभावाच्या इतिहासाचा ठसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न गौरवग्रंथातून करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, कामगार व सहकार क्षेत्रातील प्रतिनिधी, विधी क्षेत्रातील मान्यवर मंडळी व नागरिक उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले.
या पत्रकार परिषदेस प्रा महेश माने, प्रा. रियाज वळसंगकर, मुन्ना शेख, प्रा. जयप्रकाश मस्के, अल्लाबक्ष मणियार, अब्दुलरजाक मकानदार, महमद इस्माईल आदी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments