Hot Posts

6/recent/ticker-posts

बालाजी अमाईन्स लिमिटेडला रोटरी इंडियाकडून “बेस्ट प्रोजेक्ट अवॉर्ड”

 बालाजी अमाईन्स लिमिटेडला रोटरी इंडियाकडून “बेस्ट प्रोजेक्ट अवॉर्ड”



 सोलापूर (कटूसत्य वृत्त):- देशातील उद्योगसमूहांच्या सामाजिक जबाबदारीतील (CSR) उल्लेखनीय कार्याची दखल घेत रोटरी इंडिया नॅशनल CSR अवॉर्ड २०२५ जाहीर करण्यात आले असून, या प्रतिष्ठित पुरस्कारात बालाजी अमाईन्स लिमिटेड, सोलापूर या कंपनीने मोठ्या उद्योगसमूह (Large Enterprise) या गटात आरोग्य क्षेत्रासाठी (Healthcare) “बेस्ट प्रोजेक्ट” हा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला आहे.


हा पुरस्कार वितरण समारंभ दिल्लीतील माणेकशॉ सेंटर येथे पार पडला. रोटरी इंटरनॅशनलचे संचालक श्री. के. पी. नागेश यांच्या हस्ते बालाजी अमाईन्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. डी. राम रेड्डी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या कार्यक्रमास रोटरी इंटरनॅशनलचे अध्यक्ष श्री. शरत जैन, सचिव श्रीमती मंजू फडके तसेच रोटरी इंडिया नॅशनल सीएसआर अवॉर्ड समितीचे अध्यक्ष डॉ. शैलेश पालेकर उपस्थित होते.


सोलापूरातील अलिफॅटिक अमाईन्स आणि स्पेशालिटी केमिकल्स निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून ओळख असलेली बालाजी अमाईन्स लिमिटेड व्यावसायिक प्रगतीसोबतच समाजातील आरोग्यसेवेच्या उन्नतीसाठी सातत्याने कार्यरत आहे. कोविड काळापासून कंपनीने सोलापूर शहरातील तीन रुग्णालयांचे नूतनीकरण करून अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या रुग्णालयांद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना अत्यल्प शुल्कात किंवा विनामूल्य आरोग्यसेवा दिली जात आहे.


या प्रसंगी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. डी. राम रेड्डी म्हणाले, “कंपन्यांवर CSR ची जबाबदारी कायदेशीररीत्या लागू होण्यापूर्वीच आमच्या व्यवस्थापनाने १९९० च्या दशकात *‘बालाजी फाउंडेशन’*च्या माध्यमातून समाजसेवा सुरू केली होती. आरोग्य, स्वच्छता, शिक्षण, क्रीडा आणि पर्यावरण या क्षेत्रांत आम्ही सतत कार्यरत आहोत. आमचे चेअरमन श्री. ए. प्रताप रेड्डी नेहमी सांगतात की, ज्या समाजातून आपण कमावतो त्यालाच काहीतरी परत द्यावे, हीच खरी सामाजिक जबाबदारी आहे.”


रोटरी इंडियाकडून मिळालेला हा पुरस्कार बालाजी अमाईन्स लिमिटेडच्या समाजाभिमुख दृष्टीकोनाचा आणि दीर्घकालीन सामाजिक बांधिलकीचा गौरव मानला जात आहे. कंपनीने आरोग्य, शिक्षण आणि समाजकल्याणाच्या क्षेत्रात केलेले कार्य आज इतर उद्योगांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments