Hot Posts

6/recent/ticker-posts

महापालिकेत ‘सेवा हमी डॅशबोर्ड’ सुरू; नागरिकांच्या सेवांना गती

 महापालिकेत ‘सेवा हमी डॅशबोर्ड’ सुरू; नागरिकांच्या सेवांना गती



सोलापूर (कटूसत्य वृत्त) : महापालिकेच्या कामकाजातील दिरंगाई रोखण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर थेट लक्ष ठेवण्यासाठी सोलापूर महापालिकेत सेवा हमी कायदा डॅशबोर्ड सुरू करण्यात आला आहे. महापालिकेच्या वेबसाईटवरील या नव्या सुविधेमुळे कुणा अधिकारी किंवा कर्मचाऱ्याकडे किती प्रकरणे प्रलंबित आहेत, अर्ज मंजुरी/नामंजुरीची स्थिती, तसेच प्रकरणांवरील अपील व त्याची सुनावणी ही सर्व माहिती नागरिकांना ऑनलाइन पाहता येणार आहे.


१४४ सेवा ऑनलाइन, प्रत्येक प्रकरणावर लक्ष ठेवण्याची सोय

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार महापालिकेकडून सध्या जन्म–मृत्यू दाखला, व्यवसाय परवाने, नळ जोडणी, झाडांच्या फांद्या तोडणे, सेफ्टी टँक स्वच्छता, अग्निशमन सेवा, नाहरकत प्रमाणपत्रे अशा एकूण १४४ सेवा ऑनलाइन उपलब्ध आहेत. या सर्व सेवांमधील प्रलंबित आणि पूर्ण प्रकरणांचा आढावा आता डॅशबोर्डवर एकाच ठिकाणी पाहता येणार आहे.


डॅशबोर्डवर कर्मचारीनिहाय किती अर्ज प्रलंबित आहेत, हे नागरिकांना खुलेपणाने दिसणार असल्याने कामकाजातील पारदर्शकता वाढणार असून, विलंब करणाऱ्या विभागांवर आपोआपच दबाव निर्माण होणार आहे.


वेळेत काम न केल्यास दंड

सेवा हमी कायद्याच्या नियमांनुसार, कोणतेही प्रकरण विहित मुदतीत निकाली न काढल्यास संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना दर दिवसाला १०० रुपये दंड आकारला जात आहे. त्यामुळे प्रकरणे वेळेत पूर्ण करण्याकडे कर्मचाऱ्यांचा कल वाढेल, असा महापालिकेचा विश्वास आहे.


याशिवाय, नागरिकांना अपील आणि द्वितीय सेवा अपील या पर्यायांचा वापर करून थेट तक्रार नोंदवता येणार आहे. अपीलसाठी पीडीएफ अपलोडची सोय तसेच सुनावणीची तारीख एसएमएसद्वारे कळविली जाणार आहे.


नागरिकांसाठी जलद आणि पारदर्शक प्रशासनाचा मार्ग

या डॅशबोर्डमुळे महापालिकेच्या कामकाजातील दिरंगाई टळेल, प्रकरणांना गती मिळेल आणि नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि जबाबदार प्रशासनाचा अनुभव मिळणार आहे. महापालिकेतील अनेक वर्षांची बाबुशाही आणि फाईल फिरवण्याची पद्धत कमी होऊन नागरिकांची कामे अधिक जलद पूर्ण होतील, अशी अपेक्षा आहे.


ऑनलाइन सेवा डॅशबोर्ड कसा पाहायचा?

* डॅशबोर्डच्या डाव्या बाजूस सेवांची मुख्य वर्गवारी दिलेली आहे.

* त्या वर्गवारीवर क्लिक केल्यावर संबंधित उपसेवांची यादी दिसते.

* यादीतील सारांश अहवालावर क्लिक केल्यास उजव्या बाजूस


  * एकूण प्राप्त अर्ज

  * पूर्ण झालेले अर्ज

  * प्रलंबित अर्ज

    यांची तपशीलवार आकडेवारी दिसते.

प्रलंबित (विहित वेळेनंतर) अर्जांवर क्लिक केल्यास कर्मचारीनिहाय प्रलंबित प्रकरणे पाहता येतात.


सोलापूर महापालिकेतील ही नवी सुविधा नागरिकांना जलद सेवा देण्याकडे एक महत्त्वाचे पाऊल मानली जात आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments