पंढरपूर (कटूसत्य वृत्त) :- पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशीसुद्धा पांडुरंग आणि विठ्ठल या दोन्ही परिवारांकडून नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदांसाठी एकाही अधिकृत अर्जाचा दाखल न झाल्याने राजकीय तापमान चढले आहे. दोन्ही परिवार आपापले पत्ते शेवटपर्यंत गुप्त ठेवण्याच्या रणनीतीवर ठाम असल्याचे स्पष्ट होत असून शहरात ‘सस्पेन्स पॉलिटिक्स’ रंगत आहे.
नगराध्यक्षपदावर दोन नावांची जोरदार चर्चा
विठ्ठल परिवाराकडून प्रणिता भालके, तर पांडुरंग परिवाराकडून साधनाताई भोसले यांची नगराध्यक्षपदासाठीची नावं निश्चित मानली जात असल्याची चर्चा वेगाने पसरत आहे. मात्र अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसल्याने समीकरणे धूसरच राहिली आहेत. अर्ज दाखल करण्याच्या दिवसागणिक जाणाऱ्या वेळेमुळे नागरिकांमध्ये उत्सुकता अधिक वाढली आहे.
विठ्ठल परिवार – मित्र पक्ष एकजूट
पांडुरंग परिवाराच्या परिचारक गटाविरोधात विठ्ठल परिवार आणि मित्र पक्षांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे.
या महत्त्वाच्या बैठकीत आ. अभिजित पाटील, कल्याणराव काळे, भगीरथ भालके, गणेश पाटील, मनसेचे दिलीप बापू धोत्रे, राष्ट्रवादीचे अनिल सावंत, शिवसेनेचे महेश साठे यांनी सहभाग घेतला.
भगीरथ भालके यांनी दोन दिवस इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या असून अनिल सावंत यांनीही स्वतंत्र मुलाखती घेतल्याने विठ्ठल परिवार—मित्र पक्षात जागावाटपाची खलबते सुरू असल्याचे चित्र आहे.
पांडुरंग परिवार – भाजपाची अधिकृत रणनीती
पांडुरंग परिवाराचे इच्छुक उमेदवार भाजपच्या कमळ चिन्हावरच निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या निवडणुकीकडे पालकमंत्री जयकुमार गोरे, आ. समाधान आवताडे, माजी आ. प्रशांत परिचारक यांनी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.
भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी माजी नगराध्यक्षा साधना भोसले यांच्यासह आठ महिलांनी मुलाखत दिली असून साधनाताई भोसले यांचे नाव आघाडीवर असल्याचे चित्र आहे. मात्र अधिकृत घोषणा थांबवून भाजपनेही राजकीय उत्सुकता जिवंत ठेवली आहे.
राजकीय उत्सुकतेचा उच्चबिंदू
दोन्ही परिवारांनी अद्याप उमेदवारांची नावे जाहीर केली नसल्याने शहरात तर्क—वितर्कांना उधाण आले आहे.
नगराध्यक्षपदाचे अर्ज नेमके कधी दाखल होणार? कोणाचे नाव अंतिम होणार? या प्रश्नांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पडद्यामागील हालचाली वेगाने सुरू असून येत्या काही तासांत किंवा दिवसभरात मोठे निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पंढरपूर नगरपरिषद निवडणूक आता ‘राजकीय सस्पेन्स ड्रामा’च्या शिखरावर पोहोचली असून दोन्ही परिवारांकडून होणाऱ्या घोषणांची शहरवासीय आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत.
0 Comments