पंढरपूर नगरपरिषद निवडणूक: चौथ्या दिवशी चार उमेदवारी अर्ज दाखल
पंढरपूर (कटूसत्य वृत्त) :- पंढरपूर नगरपरिषदेसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी एकूण चार उमेदवारी अर्ज दाखल झाले. प्रभाग २ ‘अ’ आणि २ ‘ब’ मधून प्रत्येकी एक, तर प्रभाग ११ ‘ब’ मधून दोन अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
चौथ्या दिवशी प्रभाग २ ‘अ’ मधून अमित अशोक डोंबे, तर प्रभाग २ ‘ब’ मधून अदिती अमित डोंबे यांनी आपले अर्ज सादर केले. तसेच प्रभाग ११ ‘ब’ मधून गौतम काशीनाथ गाजरे आणि प्रशांत शिवाजी मलपे यांनीही प्रत्येकी एक अर्ज दाखल केला.
एकूण अर्जांची संख्या सहा
चौथ्या दिवसाअखेर एकूण ६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
पहिल्या दिवशी काँग्रेसचे नूतन शहराध्यक्ष आदित्य फत्तेपूरकर यांनी एकमेव अर्ज दाखल केला होता.
दुसऱ्या दिवशी नगरसेवक किंवा नगराध्यक्ष पदासाठी एकही अर्ज दाखल झाला नव्हता.
तिसऱ्या दिवशी रुक्मिणी धनाजी धोत्रे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून अर्जांची संख्या वाढवली.
चौथ्या दिवशी आणखी चार अर्ज दाखल होत निवडणुकीची रंगत वाढली आहे.
१७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार
उमेदवारांना पंढरपूर नगरपरिषद सभागृहात दररोज सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची सुविधा देण्यात आली आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबर असून शेवटच्या दोन दिवसांत अर्जांची संख्या लक्षणीय वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पांडुरंग व विठ्ठल परिवारांकडे सर्वांचे लक्ष
राजकीय गड पंढरपूरमध्ये पांडुरंग परिवार आणि विठ्ठल परिवार या दोन प्रमुख गटांपैकी कोण उमेदवार मैदानात उतरवणार, याकडे नागरिकांचे विशेष लक्ष लागले आहे. चौथ्या दिवशीही या दोन्ही परिवारांकडून कोणताही अर्ज दाखल न झाल्याने राजकीय उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
नामनिर्देशन प्रक्रिया वेग घेत असून आगामी काही दिवसांत निवडणुकीची समीकरणे अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
0 Comments