मंगळवेढा (कटूसत्य वृत्त) : मंगळवेढा नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षासमोर सर्वपक्षीय आघाडी आव्हान उभे करत असली तरी स्वतः आघाडीसमोरच नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निश्चित करण्याचे कठीण आव्हान उभे ठाकले आहे. आघाडीतील चार इच्छुक उमेदवारांमधून एका नावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी दोन दिवसांत अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.
आघाडीच्या चर्चेत असलेल्या नावांमध्ये माजी नगराध्यक्षा अरुणा मुरलीधर दत्तू, सुनंदा बबनराव आवताडे, सुवर्णा अशोक केळकर आणि शुभांगी चंद्रशेखर कोंडूभैरी यांचा समावेश आहे. भालके, आवताडे, ढोबळे आणि सावंत गटांच्या चर्चेनंतर आघाडीचा एकच अधिकृत उमेदवार निश्चित करण्यात येणार आहे.
भाजपमध्येही उमेदवारीवर खळबळ
नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून चार इच्छुकांची मुलाखत घेण्यात आली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सदस्य अजित जगताप यांच्या पत्नी सुप्रिया जगताप यांनी भाजपकडून मुलाखत देणे हा राजकीय ‘ट्विस्ट’ ठरला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत जगताप गटाने आ. समाधान आवताडे यांना पाठिंबा दिल्याने राजकीय समीकरणे एका दिशेने झुकलेली दिसत होती. मात्र आता भाजपा—राष्ट्रवादी संबंधांमध्ये अनिश्चितता निर्माण झाली आहे.
भाजपने ‘ज्या ठिकाणी पक्षाचा आमदार, तिथे पक्षचिन्हावर निवडणूक’ हे धोरण स्वीकारल्याने मंगळवेढा नगरपरिषद निवडणूक कमळ चिन्हावर लढवण्याची तयारी सुरू आहे. या निर्णयामुळे महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या दाव्याला बाधा येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणूनच सुप्रिया जगताप यांनी भाजपकडून उमेदवारी मागितल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादीची स्वतंत्र तयारी
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस तांबोळी यांनी सांगितले की, पक्षाकडून २६ नगरसेवक पदांसाठी अर्ज आणि एक नगराध्यक्ष पदाचा अर्ज प्राप्त झाला आहे. महायुतीची अधिकृत आघाडी झाली नाही तर राष्ट्रवादी स्वतंत्र पॅनेल उभे करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आघाडीत उमेदवारीसाठी ‘फिल्डिंग’
सध्याच्या राजकीय वातावरणात सर्वपक्षीय आघाडीत नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक नेते आपापल्या गटाच्या ‘गॉडफादर’मार्फत स्वतःची बाजू मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र निर्णय झाल्यावर निवडून आणण्यासाठी सर्वजण एकत्र येणार असल्याचा दावा आघाडीतील नेते करत आहेत.
शहरात सध्या दोन गट स्पष्टपणे दिसत आहेत —
भाजप विरुद्ध सर्वपक्षीय आघाडी.
तथापि, अजित जगताप यांची भूमिका अद्याप स्पष्ट न झाल्याने त्यांच्या समर्थक नगरसेवकांचा पुढील निर्णय काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
माजी नगरसेवक प्रवीण विजय खवतोडे यांनी प्रभाग १० ‘अ’ मधून, तर अरुणा विजय खवतोडे यांनी प्रभाग ३ ‘अ’ मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
ही चुरस लक्षवेधी ठरत असून मंगळवेढ्यातील नगराध्यक्षपदाची निवडणूक ‘हाय-व्होल्टेज’ होण्याची चिन्हे आहेत.
0 Comments