टमटम चालकाच्या मुलाची भारतीय सैन्यात ‘अग्निवीर’ म्हणून निवड
आकुंभे गावाचा अभिमान—पवन काकडेचा पत्रकार बांधवांच्या वतीने सत्कार
टेंभुर्णी/प्रतिनिधी –
माढा तालुक्यातील आकुंभे या छोट्याशा गावातील एक सामान्य टमटम चालकाचा मुलगा थेट भारतीय सैन्यात दाखल होऊन गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. पवन बंडू काकडे यांची भारतीय आर्मीमध्ये ‘अग्निवीर’ म्हणून निवड झाली असून, ही संपूर्ण आकुंभे ग्रामस्थांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
पवनचे वडील बंडू काकडे टमटम चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मुलगा देशसेवेत जावा, ही त्यांची मनोमन इच्छा होती. यासाठी त्यांनी अनेक अडचणींवर मात करत पवनला आर्मी भरतीची तयारी करण्यासाठी अकॅडमीमध्ये प्रशिक्षणास ठेवले. पवनने स्वतःच्या कठोर परिश्रम, शिस्त, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर सैनिकी भरतीसाठी तयारी करत अखेर ‘अग्निवीर’ पदावर आपली चमकदार निवड सुनिश्चित केली.
ही निवड व्यक्तिगत यशापलीकडे जाऊन आकुंभे गावासाठी अभिमानाची, तर टेंभुर्णी परिसरातील युवकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. पवनच्या यशाचा आदर्श घेऊन येथील युवकांनी भारतीय आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तसेच पोलीस, सीआरपीएफ यांसारख्या सुरक्षा दलांत संधी शोधावी, असा सकारात्मक संदेश या घटनेनिमित्ताने दिला जात आहे.
दरम्यान, अग्निवीर पवन काकडे यांचा टेंभुर्णी शहरातील कुर्डूवाडी चौक येथे पत्रकार बांधवांच्या वतीने सत्कार करून गौरविण्यात आला. यावेळी त्यांना हार, फेटा तसेच भारतीय संविधानाची प्रत प्रदान करण्यात आली.
या सत्कार कार्यक्रमास पत्रकार संतोष वाघमारे, पत्रकार अनिल जगताप, पत्रकार गाडेकर सर, पत्रकार भैया देशमुख, पत्रकार महावीर वजाळे, तसेच आरपीआय नेते परमेश्वर खरात, अनिल जगताप आणि महेंद्र सोनवणे उपस्थित होते.
सत्कार सोहळ्यास मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. यामध्ये राजवर्धन वजाळे, रंजीत करंडे, उमेश पाटोळे, सुमित पाटोळे, रोहन पाटोळे, सोमा गोडसे, किरण पाटोळे, रोहित पाटोळे, अक्षय पाटोळे, आनंद बनसोडे, शंभू पाटोळे, अथर्व गोरवे, अण्णासाहेब खराडे, समाधान चव्हाण, गणेश पाटोळे, विनायक गवळी, किरण शिंदे आदींचा समावेश होता.
पवन काकडे यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी गावातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांच्या या कामगिरीने ग्रामीण भागातील तरुणांसाठी नवी प्रेरणा निर्माण केली आहे.
0 Comments