Hot Posts

6/recent/ticker-posts

पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीत ‘विठ्ठल परिवर्तन आघाडी’कडून दिवाकर सर्वगोड उमेदवार

 पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीत ‘विठ्ठल परिवर्तन आघाडी’कडून दिवाकर सर्वगोड उमेदवार





पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- 

पंढरपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी श्री विठ्ठल परिवर्तन आघाडीकडून शहरातील समाजसेवेसाठी ओळखले जाणारे दिवाकर दिगंबर सर्वगोड यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळ मृतदेहांवर अंत्यविधी करण्याची अत्यंत कठीण, निस्वार्थ आणि संवेदनशील सेवा बजावणारे दिवाकर उर्फ बापू सर्वगोड हे पंढरपूरातील ‘अवलिया’ म्हणून सर्वपरिचित आहेत. “मानवाचा मृतदेह हाच परमेश्वर आणि त्यावरील क्रियाकर्म हीच पूजा” — या भावनेने त्यांनी आयुष्यभर सामाजिक कार्याला समर्पित केले.

पंढरीत दर्शनासाठी आलेल्या वारकऱ्यांपैकी मृत्यू पावलेले यात्रेकरू असोत अथवा बेवारस व्यक्ती — अशा हजारो मृतदेहांचा सन्मानपूर्वक अंतिम संस्कार करण्याचे कार्य त्यांनी स्वतःच्या हाताने पार पाडले आहे. देवाच्या दारात मरण आल्यास स्वर्ग मिळतो, या श्रद्धेने येणाऱ्यांच्या ‘अंतिम यात्रा’ची जबाबदारी ते अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडत आले आहेत.

प्रसिद्धी, स्वार्थ किंवा यशाकडे न पाहता निरपेक्ष वृत्तीने केलेली सेवा हे त्यांच्या जीवनकार्याचे वैशिष्ट्य आहे.

दिवाकर सर्वगोड हे सामाजिक कार्यकर्ते रवी सर्वगोड यांचे वडील असून, त्यांच्या कुटुंबात समाजसेवेचा वारसा पिढ्यान्पिढ्या जपला जात आहे.

आगामी नगरपरिषद निवडणुकीत पंढरपूर शहरातील अनुसूचित जातीसाठी आरक्षित प्रभाग क्रमांक ६ मधून दिवाकर सर्वगोड उमेदवारीच्या रिंगणात उतरले आहेत. तळागाळातील नागरिकांच्या समस्या, मूलभूत गरजा आणि प्रभागातील विकासकामे प्राधान्याने पूर्ण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments