Hot Posts

6/recent/ticker-posts

संत नामदेव महाराज पालखीचे आळंदीकडे प्रस्थान

 संत नामदेव महाराज पालखीचे आळंदीकडे प्रस्थान



50 दिंड्यांसह 3 हजार भाविकांचा सहभाग
। पंढरपूर, प्रतिनिधी
चला आळंदीला जाऊ।
ज्ञानदेवा डोळा पाहू॥
कैवल्य साम्राज्य संतश्रेत्र ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी तिर्थक्षेत्र पंढरी नगरीतून श्रीसंत नामदेव महाराजांच्या पालखी सोहळ्याने पौर्णिमे दिवशी बुधवारी तिर्थक्षेत्र आळंदीकडे प्रस्थान केले. पालखी सोहळ्यामध्ये सुमारे 50 दिंड्यांसह 3 हजार वारकरी, भाविक सहभागी झाले आहेत.
प्रारंभी कार्तिकी पौर्णिमेनिमित्त गोपाळपूर येथे होणार्‍या गोपाळकाल्यासाठी प्रदक्षिणा रोडवरील संत नामदेव मंदिरातून संत नामदेव महाराजांचा पालखी सोहळा गोपाळपूर येथे गेले. त्याठिकाणी ह.भ.प. नामदास महाराजांचे काल्याचे कीर्तन झाले. भाविकांनी एकमेकांना काल्याचा प्रसाद देवून गोपाळकाला साजरा केला. त्यानंतर पालखी सोहळा श्री विठ्ठलाच्या भेटीसाठी विठ्ठल मंदिरात गेला. त्याठिकाणी श्री विठ्ठल-रुक्मिणीची भेट घेण्यात आली. यावेळी मंदिर समितीच्यावतीने पादुकांचे दर्शन घेवून ह.भ.प. नामदास महाराज यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर पालखी सोहळा पुन्हा मंदिरात आला.
ये ग ये ग विठाबाई ।
माझे पंढरीचे आई ॥
दुपारचे भोजन व विश्रांती घेतल्यानंतर पालखी सोहळ्याने ज्ञानोबा-तुकाराम, नामदेव-जनाबाई असा गजर करत आळंदीकडे प्रस्थान ठेवले. श्री केशवराज व संत नामदेव महाराजांची आरती करण्यात आली. पालखी सोहळ्यातील मानकर्‍यांना मंगळवारीच ह.भ.प.नामदास महाराजांच्या हस्ते मानाचे श्रीफळ देण्यात आले. यावेळी श्री केशवराज संस्थेच्यावतीने पालखी सोहळ्यासाठी 11 हजार रुपयांची देणगी विश्वस्त राजेश धोकटे सर, जयवंत कांबळे यांच्या हस्ते ह.भ.प. नामदास महाराजांकडे देण्यात आली.
बुधवारी पालखी सोहळा मंदिरातून निघून संत नामदेव पायरी येथे पालखी आल्यानंतर मानाचे अभंग व आरती म्हणण्यात आली. महाद्वार, पश्चिमद्वार, चौफाळा, शिवाजी चौक, अर्बन बँक, सरगम चौक, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयमार्गे हा सोहळा विसावा मंदिर इसबावी येथे आला. येथे विसावा घेवून अभंग, आरती करण्यात आली. यावेळी सेवक राजाभाऊ जवंजाळ, छायाचित्रकार किशोर काकडे यांच्यासह वारकरी व शिंपी समाज बांधव उपस्थित होते.
पालखी सोहळ्यात सर्वात प्रथम नगारखाना त्यानंतर खांद्यावर भगवी पताका घेतलेले वारकरी, टाळकरी, अश्व, घोडेस्वार, डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला अशा शाही लवाजम्यासह पंढरी नगरीचा निरोप घेवून पालखी सोहळा आळंदीच्या दिशेने मार्गस्थ झाला.
पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. माधव महाराज तसेच सर्वश्री ह.भ.प. केशव महाराज, कृष्णदास महाराज, मुकुंद महाराज, ज्ञानेश्वर महाराज नामदास यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठल महाराज, मुरारी महाराज, एकनाथ महाराज, केदार महाराज, भावार्थ, हरी, विणेकरी यांच्यासह समस्त नामदास महाराज परिवार व शिष्यगण पालखी सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी प्रयत्नशील आहेत. या पालखी सोहळ्यासमवेत संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी यांनी पाण्याचा टँकर तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुणे जिल्हा व स्व. तात्या बापट स्मृती समिती चिंचवड यांच्यावतीने भाविकांसाठी मोफत फिरत्या दवाखान्याची (रुग्णवाहिका) सोय करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षापासून त्यांची ही सेवा अखंडपणे सुरु असून याबद्दल भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
आळंदी हे गाव, पुण्यभूमी ठाव।
दैवताचे नाव सिध्देश्वर
पंढरपूरहून निघालेला हा पालखी सोहळा भंडीशेगाव, वेळापूर, माळशिरस, नातेपुते, फलटण, जेजुरील सासवड, पुणेमार्गे सुमारे 8 दिवसांचा पायी प्रवास करून आळंदी येथे पोहोचणार आहे. त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त भरणार्‍या यात्रेत हा पालखी सोहळा सहभागी होणार आहे. पालखीचा मुक्काम आळंदी येथील श्री विष्णू मंदिरात राहणार आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments