दहशत संपवून विकासराज आणू” – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
शिवसेना शिंदे गटाचा शक्तीप्रदर्शनात प्रचाराचा शुभारंभ
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना (शिंदे गट) ने जबरदस्त ताकद दाखवत आपल्या जाहीर प्रचाराचा भव्य शुभारंभ केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेला उसळलेल्या प्रचंड गर्दीने शहरातील राजकीय तापमान उसळी घेतले.
या सभेत शिंदे यांनी मोहोळमधील सध्याच्या राजकारणावर जोरदार हल्ला चढवत “मोहोळमध्ये दहशतवाद, गुंडगिरी, भयाचे राज्य संपवण्याची वेळ आली” असा थेट संदेश दिला.
“धनुष्यबाण म्हणजे विकासाची खान” शिंदे आवेशपूर्ण गर्जना करीत म्हणाले, “शिवसेना म्हणजे ८०% समाजकारण आणि २०% राजकारण.” “गेल्या अडीच वर्षात हजारो कोटींचे कल्याणकारी निर्णय राज्यात घेतले.” “मोहोळचे परिवर्तन अनिवार्य असून विकासासाठी आवश्यक निधी कधी कमी पडू देणार नाही.”
शिंदे पुढे म्हणाले, “३ तारखेला मोहोळच्या आकाशात फक्त आणि फक्त धनुष्यबाणाचाच गुलाल उडेल. त्यानंतर मी पुन्हा तुमच्यात येऊन विकासाचे नवीन पर्व सुरू करेन.” मोहोळमधील शिवसैनिकांच्या बलिदानाचा उल्लेख करत त्यांनी नागरिकांना आवाहन केले. “मोहोळमध्ये स्थैर्य, शांतता आणि विकास हवा असेल तर संपूर्ण पॅनल धनुष्यबाणावर विजयी करा.”
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील बोलताना म्हणाले, “मोहोळचा रक्तरंजित इतिहास आणि २००५ च्या घटना अजूनही विसरता येत नाहीत.” “मोहोळमध्ये शांतता, स्थैर्य आणि विकास हवा असेल तर शिवसेनेचाच नगराध्यक्ष हवा.”
पाटील पुढे बोलताना स्पष्ट म्हणाले, “मी माझ्या पक्षाचे उमेदवार न उतरवता थेट धनुष्यबाणाला पाठिंबा देतोय, कारण मोहोळच्या हितासाठी हेच योग्य आहे.”
शहरातील राजकारणातील महत्त्वाचे नेते आणि पॅनल प्रमुख रमेश बारसकर यांनी गेल्या ३० वर्षांच्या मोहोळच्या राजकीय इतिहासाची उकल करत माजी आमदार राजन पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
बारसकर पुढे म्हणाले, “मी नगराध्यक्ष असतानाच प्रत्यक्ष विकास झाला.” “त्यानंतर प्रशासक आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने मोहोळच्या रस्त्यांपासून पाणीपुरवठ्यापर्यंत कोणताही विकास होऊ दिला नाही.”
“आज मोहोळची अवस्था बिकट आहे; ५० एकर सौर प्रकल्प उभारून प्रत्येक घराला १०० युनिट मोफत वीज देण्याची आमची प्रतिज्ञा आहे.” अल्पसंख्याक उमेदवारांना धमकावण्याच्या प्रकारांवरून त्यांनी थेट टीका करत विचारले, “हे लोकशाही आहे की गुंडशाही?”
पुढे त्यांनी सांगितले, “शिंदे साहेबांनी १६ कोटींचा निधी देऊन मुख्य रस्त्याला गती दिली. पुढील संपूर्ण विकासासाठी आमच्यामागे ठाम उभे रहा.”
सोलापुर जिल्हा प्रमुख चरणराज चवरे म्हणाले, “३० वर्षांत प्रस्थापितांनी मोहोळचा एकही विकास केला नाही. विरोधकांना विकास म्हणजे काय हे दाखवण्यासाठी तुम्ही आम्हाला संधी द्या आणि निधी आम्ही आणून दाखवू.”
यावेळी मंचकावर आ. राजू खरे, संजय कदम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, ओबीसी राज्य प्रमुख रमेश बारसकर, शिवसेना जिल्हाध्यक्ष चरणराज चवरे, शिवसेना स्टार प्रचारक ज्योती वाघमारे, पद्माकर देशमुख, क्षमा बारसकर, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सिद्धीताई वस्त्रे, श्रीकांत गायकवाड, उज्वला थिटे, तनवीर शेख, मिलिंद अष्टुळ, चंद्रकांत वाघमोडे, सूरज जम्मा आणि इतर पदाधिकारीसह मान्यवर उपस्थित होते.
सभेत शहरातील विविध प्रभागांतील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. सभेला हजारोंच्या उपस्थितीने शिंदे गटाचा आत्मविश्वास शिगेला.
चौकट १
सभेत बारसकर यांनी शिंदे यांच्याकडे प्रमुख मागण्या मांडल्या, मोहोळ शहराला उपजिल्हा रुग्णालय, दर्जेदार स्वच्छ पिण्याचे पाणी, क्रीडा संकुल, शहर व तालुक्याच्या सोयीसाठी प्रशस्त एसटी डेपो,
या सुविधा तातडीने उपलब्ध करण्याची मागणी त्यांनी केली.
चौकट २
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी न्यायप्रविष्ट बाबीवर बोलणं उचित नाही. परंतु त्यांना त्यांच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी चुकीची माहिती दिली असल्याने ते बोलले असतील. -माजी आमदार राजन पाटील


0 Comments